मुंबई

Kishori Pednekar: किशोरी पेडणेकरांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! गुन्हे लपवल्याच्या आरोपावरील तातडीची सुनावणी नाकारली; प्रभाग 199 मधून लढणार निवडणूक

Bombay High Court On Kishori Pednekar : शिंदे गटाच्या सुशी शहा यांनी केली होती याचिका; निवडणूक 3 दिवसांवर असल्याने न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास दिला नकार

मुंबई | मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर Kishori Pednekar यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करत त्यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या प्रवक्त्या सुशी शहा यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

काय आहे आरोप?

सुशी शहा यांच्या याचिकेनुसार, किशोरी पेडणेकर यांनी प्रभाग क्रमांक 199 (मध्य मुंबई) मधून अर्ज भरताना आपल्यावर असलेल्या 5 गंभीर गुन्ह्यांची माहिती हेतुपुरस्सर दडपली आहे. यात प्रामुख्याने कोरोना काळातील कथित ‘बॉडी बॅग’ घोटाळा आणि फसवणुकीच्या प्रकरणांचा समावेश असल्याचे याचिकेत म्हटले होते. पेडणेकर यांनी खोटी माहिती देऊन निवडणूक प्रक्रियेची दिशाभूल केल्याचा दावा करत त्यांचा अर्ज बेकायदेशीर ठरवून फेटाळण्याची मागणी शहा यांनी केली होती.

न्यायालयाने काय म्हटले?

सोमवारी मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी वकील कल्पेश जोशी यांनी केली. तथापि, गुरुवारी (15 जानेवारी) मतदान होणार असल्याने आणि निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने न्यायालयाने यात तातडीने हस्तक्षेप करण्यास असमर्थता दर्शवली. “निवडणूक प्रक्रिया सुरू असताना आम्ही तातडीने सुनावणी घेऊ शकत नाही, यावर निवडणुकीनंतर सुनावणी घेतली जाईल,” असे न्यायालयाने स्पष्ट केले.
निवडणुकीचा मार्ग मोकळा
न्यायालयाच्या या भूमिकेमुळे किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीवर आलेले तात्पुरते संकट टळले आहे. प्रभाग 199 मध्ये त्या आता अधिक जोमाने प्रचार करू शकणार आहेत. मात्र, निवडणुकीनंतर या याचिकेवर होणाऱ्या सुनावणीत जर आरोप सिद्ध झाले, तर त्यांच्या निवडीवर भविष्यात टांगती तलवार राहू शकते.

vivek

Recent Posts