Kirit Somaiya : भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा उद्धव ठाकरे सह संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला
•होर्डिंग व पेट्रोल पंपाची किती कमाई मातोश्री आणि भांडुप चा हिस्सा जातो… Kirit Somaiya
मुंबई :- घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. होर्डिंग व पेट्रोल पंपाची किती कमाई ‘मातोश्री’ अर्थात उद्धव ठाकरेंकडे जाते व त्यात भांडूपचा हिस्सा किती? असा सवाल त्यांनी या दोघांना उद्देशून केला आहे.
घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी किरीट सोमय्या यांनी बुधवारी एक निवेदन व व्हिडिओ जारी केला. त्यात त्यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. घाटकोपर पेट्रोल पंपची जागा ही महाराष्ट्र सरकारच्या पोलिस हाऊसिंगची आहे. पण उद्धव ठाकरे सरकारने ऑक्टोबर 2021 मध्ये बेकायदेशीरपणे ही जागा पेट्रोल पंप लावण्यासाठी LORD’S MARK INDUSTRIES LTD. या कंपनीला दिली. तर होर्डिंग लावण्याचे कंत्राट भावेश भिंडे यांच्या मे. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले, असे सोमय्या म्हणाले.घाटकोपर पेट्रोल पंप व होर्डिंगद्वारे वार्षिक प्रत्येकी 25 कोटी असे एकूण 50 कोटींचे उत्पन्न मिळते. या 50 कोटींतून किती पैसे मातोश्रीला जातात व किती पैसे भांडूपला जातात याचा हिशेब संजय राऊत देतील का? असा सवालही किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे भावेश भिंडे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले होते, असा दावाही सोमय्या यांनी यावेळी केला.
तर दुसरीकडे, घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलेल्या ठिकाणी 45 तासांनंतरही पोकलेनने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. बुधवारी या ठिकाणी ढिगाऱ्याखाली एक लाल रंगाची कार अडकल्याची दिसून आली. त्यात 2 जण अडकल्याची शक्यता आहे. लोखंडी ढिगाऱ्यामुळे ही कार पूर्णपणे चेपली आहे. त्यामुळे त्यातील प्रवाशी जिवंत असण्याची फार कमी शक्यता आहे. घटनास्थळी मुंबई महापालिका, एनडीआरएफ व मुंबई पोलिसांकडून मदतकार्य राबवण्यात येत आहे.