Khopoli News : खोपोली हत्याकांडाचे राजकीय पडसाद! सुधाकर घारे, भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; पोलिसांकडून अटकेची तयारी

Khopoli Mangesh Kolokhe Murder News : मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील आरोपींच्या अडचणीत वाढ; पनवेल सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
खोपोली | शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येच्या 12 दिवसांनंतर या प्रकरणातील राजकीय धागेदोरे अधिक गडद झाले आहेत. या गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि खोपोली शहराध्यक्ष भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे या दोन्ही बड्या नेत्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नेमके प्रकरण काय?
गेल्या 26 डिसेंबर रोजी खोपोली येथे मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यातून ही सुपारी देऊन करण्यात आलेली हत्या असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने, “एका बड्या राजकीय पुढाऱ्याने सुपारी दिल्यानेच ही हत्या केली,” अशी कबुली दिल्याने तपासाची सुई सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्याकडे वळली होती.
न्यायालयाची कडक भूमिका
अटक टाळण्यासाठी घारे आणि भगत यांनी पनवेल न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मंगळवारी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने या हत्येमागील कट आणि आरोपींचा सहभाग याचे पुरावे सादर केले. प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासात अडथळा येऊ नये, ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाने दोघांचेही जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
खोपोलीत तणावपूर्ण शांतता
मंगेश काळोखे हे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने या हत्येमुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या हत्याकांडाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खोपोली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


