ठाणे

KDMC News : कल्याण-डोंबिवलीत शिंदे सेनेला मोठे भगदाड! अभ्यासू नेते श्रेयस समेळ यांचा 50 पदाधिकाऱ्यांसह राजीनामा; डोंबिवलीत विभागप्रमुख मनसेत

KDMC Latest News : “नेत्यांनी चुकीची माहिती ऐकून उमेदवारी कापली”; श्रेयस समेळ यांचा संताप, कल्याण पश्चिमेत शिवसेनेसमोर संकट

कल्याण | कल्याण-डोंबिवली महानगरपालिका KDMC Election निवडणुकीत तिकीट वाटपावरून सुरू झालेला असंतोष आता उफाळून आला आहे. पक्षात गेली 15 वर्षे नगरसेवक म्हणून प्रभावी कामगिरी करणारे आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक श्रेयस समेळ यांना डावलल्याने त्यांनी मंगळवारी सामूहिक राजीनामा सत्राचा बॉम्ब टाकला. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या ५० महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे.

अभ्यासू नेतृत्वाची पक्षाकडे पाठ

श्रेयस समेळ यांची पालिकेत एक अभ्यासू नगरसेवक आणि आक्रमक वक्ता म्हणून ओळख आहे. विषयाची सखोल मांडणी आणि विकासकामांचा पिच्छा पुरवण्यात त्यांचा हातखंडा असल्याने त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, पॅनल क्रमांक ९ मधून त्यांचे नाव कापले गेल्याने समेळ समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली.

सामूहिक राजीनामा: आपल्या जनसंपर्क कार्यालयात जमलेल्या समर्थकांच्या आग्रहाखातर समेळ यांनी स्वतःसह 50 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवून दिले आहेत.

“पक्षासाठी ही धोक्याची घंटा”

राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना श्रेयस समेळ यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, “काही लोकांनी स्वार्थासाठी वरिष्ठांना माझ्याबद्दल चुकीची माहिती दिली आणि त्याची खातरजमा न करताच माझी उमेदवारी कापण्यात आली. जे लोक प्रभागात शिवसेना शिल्लक ठेवणार नाहीत, त्यांच्या शब्दाला नेते महत्त्व देत असतील, तर ही पक्षासाठी धोक्याची घंटा आहे.”

डोंबिवलीत ‘जयंता पाटील’ यांचे मनसेमध्ये प्रस्थान

केवळ कल्याणमध्येच नव्हे, तर डोंबिवलीतही शिंदे सेनेला धक्का बसला आहे. आजदेपाडा भागातील शिवसेनेचे विभागप्रमुख जयंता दत्तु पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी आपल्या मुलीसह मनसेमध्ये प्रवेश केला असून, आता ते मनसेच्या इंजिनवर स्वार होऊन निवडणूक लढवणार आहेत.

शिंदे सेनेसमोर बंडखोरी थोपवण्याचे आव्हान

कल्याण आणि डोंबिवली हे दोन्ही भाग शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. मात्र, समेळ आणि पाटील यांसारख्या जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने आगामी निवडणुकीत शिंदे सेनेच्या जागांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

vivek

Recent Posts