मुंबई

KDMC News : कल्याणमध्ये सत्तेचा महासंग्राम! ठाकरेंचे 4 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; कोकण विभागीय कार्यालयात खळबळ; ‘मोठ्या भावा’च्या वादात शिंदेंची सरशी?

KDMC Latest Political News : ठाकरे गटाचे 7 नगरसेवकच कार्यालयात हजर; आमदार वरुण सरदेसाई कोकणात तळ ठोकून; महापौरपदासाठी भाजप-शिंदे सेनेत ‘स्ट्राईक रेट’वरून जुंपली

कल्याण | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत KDMC Election बहुमताचा आकडा (62) गाठण्यासाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात ‘कांटे की टक्कर’ सुरू असतानाच, शिवसेना (ठाकरे) ठाकरे गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नोंदणीसाठी कोकण विभागीय कार्यालयात ठाकरे गटाचे 11 पैकी केवळ 7 नगरसेवक पोहोचले, तर 4 नगरसेवक अद्यापही ‘नॉट रिचेबल’ असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दोन नगरसेवक वाटेत असून लवकरच पोहोचतील, असा दावा केला असला तरी, उर्वरित नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे संशयाचे वातावरण गडद झाले आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि संभाव्य फूट रोखण्यासाठी स्वतः आमदार वरुण सरदेसाई यांनी कोकण विभागीय कार्यालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे, शिंदे गटाने फोडाफोडीचे आरोप फेटाळले असून, “अनेक नगरसेवक विकासासाठी आमच्या संपर्कात आहेत,” असे सूचक विधान केले आहे.

‘मोठा भाऊ’ कोण?

भाजप-शिंदेंमध्ये रस्सीखेच कल्याणमध्ये महायुतीच्या अंतर्गतही महापौरपदावरून कलगीतुरा रंगला आहे:

शिवसेना (शिंदे गट): 53 नगरसेवकांसह आम्ही सर्वात मोठा पक्ष आहोत, त्यामुळे आमचाच ‘मोठा भाऊ’ म्हणून महापौर असावा, असा शिंदे गटाचा दावा आहे.

भाजप: 50 नगरसेवक असले तरी आमचा ‘स्ट्राईक रेट’ शिंदेंपेक्षा सरस असल्याचा दावा करत भाजपही महापौरपदावर अडून बसली आहे.

मुंबईतही बहुमताची कसरत केवळ कल्याणच नाही, तर मुंबईतही भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरूनही बहुमतापासून दूर आहे. मुंबईतही भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांच्या पाठिंब्याची अनिवार्य गरज आहे. अशा परिस्थितीत, कल्याणमध्ये शिंदेंचा महापौर आणि मुंबईत भाजपचा महापौर, असा ‘गिव्ह अँड टेक’चा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, कल्याणमधील ठाकरे गटाचे 4 नगरसेवक जर शिंदे गटात सामील झाले, तर सत्तेचे पारडे पूर्णपणे शिंदेंच्या बाजूने झुकू शकते.

vivek

Recent Posts