
Shrikant Shinde On KDMC : ठाणे-कल्याणच्या सत्तेसाठी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांची होणार बैठक; विकासासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागतच; श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
कल्याण | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत KDMC सर्वाधिक 53 जागा जिंकणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा ठाम विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. कोकण भवन येथे शिवसेनेच्या 53 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी करण्यासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ कल्याणच नव्हे, तर मुंबई आणि उल्हासनगरमध्येही महायुतीचीच सत्ता येईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. KDMC Breaking News
मनसेचा पाठिंबा आणि भाजपशी नाते मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “राजू पाटील माझे मित्र आहेत. कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी त्यांनी महायुतीला समर्थन देण्याचा निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, याचा अर्थ असा नाही की आम्ही भाजपला बाजूला ठेवले आहे. भाजप आणि शिवसेना युतीमध्येच निवडणूक लढले आहेत आणि युतीमध्येच आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत.”
अंतिम निर्णय शिंदे-चव्हाण घेतील महापौर, उपमहापौर किंवा वैधानिक समित्यांच्या सभापतीपदाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. “पदे कोणाला मिळणार, याचा सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहेत. त्यांची आज किंवा उद्या बैठक होईल आणि त्यामध्ये सत्तेचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल,” अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.
विकासासाठी सर्वसमावेशक भूमिका “विकासाच्या मुद्द्यावर जो कोणी सोबत येईल, त्यांना आम्ही सोबत घेऊ,” असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी इतर अपक्ष किंवा लहान पक्षांसाठीही दरवाजे उघडे असल्याचे सांगितले. कल्याण-डोंबिवलीत सध्या 53 (शिवसेना) + 50 (भाजप) + 7 (मनसे समर्थित) असे मोठे संख्याबळ महायुतीकडे असल्याने सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.



