मुंबई

KDMC News : कल्याण-डोंबिवलीत मतदानापूर्वीच महायुतीचा ‘विजयाचा शंखनाद’! 12 उमेदवार बिनविरोध; बहुमतासाठी आता केवळ 50 जागांची गरज

KDMC Political Latest News : रविंद्र चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपची सातबारावर पकड; मनसे शहराध्यक्षांच्या माघारीमुळे महेश पाटील बिनविरोध!

कल्याण | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या KDMC News निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण Ravindra Chavan यांच्या रणनीतीने विरोधकांना चारी मुंड्या चित केले आहे. निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच भाजपने 7 आणि शिवसेना शिंदे गटाने 4 अशा एकूण 12 जागांवर बिनविरोध विजय मिळवत महायुतीची आघाडी भक्कम केली आहे. विशेषतः भाजपच्या उमेदवारांनी बिनविरोध निवडीची ‘हॅट्रिक’ साध्य केल्यानंतर ही संख्या आता 8 वर पोहोचली आहे.

भाजपचा ‘बिनविरोध’ विजयाचा धडाका

सुरुवातीला रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांच्या विजयाने भाजपने खाते उघडले होते. त्यानंतर रविंद्र चव्हाण ज्या प्रभागातून प्रथम नगरसेवक झाले होते, त्या प्रभागातून रंजना पेणकर याही बिनविरोध विजयी झाल्या. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण होते:

प्रभाग 26 (अ): मुकुंद पेडणेकर यांची बिनविरोध निवड.

प्रभाग 28 : येथील लढत सर्वात लक्षवेधी ठरली. मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने भाजपचे महेश पाटील बिनविरोध निवडून आले आहेत.

प्रभाग 19 (क): साई शिवाजी शेलार यांनीही बिनविरोध विजयाची माळ आपल्या गळ्यात पाडली आहे.

महायुतीची बहुमताकडे वेगाने वाटचाल

केडीएमसीच्या एकूण 122 जागांपैकी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 62 जागांची आवश्यकता आहे. महायुतीने 12 जागा आधीच खिशात टाकल्यामुळे आता त्यांना बहुमतासाठी केवळ 50 जागांची गरज उरली आहे. विरोधकांनी निवडणुकीपूर्वीच नांगी टाकल्याचे चित्र या बिनविरोध निवडींमुळे दिसत असून, भाजप-शिवसेना महायुतीने निवडणुकीत मोठी मनोवैज्ञानिक आघाडी घेतली आहे.

निवडणुकीचे चित्र स्पष्ट?

रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ‘विजयाचा शंखनाद’ महायुतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरला आहे. आता उरलेल्या 110 जागांसाठी 13 दिवसांनी मतदान होणार असले, तरी 12 जागांच्या आघाडीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मनसे आणि इतर पक्षांच्या उमेदवारांनी घेतलेली माघार ही महायुतीच्या छुप्या रणनीतीचा भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपचे आठ बिनविरोध विजयी उमेदवार

1.कल्याण-डोंबिवली – वॉर्ड १८ मधून भाजपच्या रेखा चौधरी

2.कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ क मधून भाजपच्या आसावरी नवरे

3.कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ ब भाजपच्या रंजना पेणकर

4.कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून भाजपच्या ज्योती पाटील

5.कल्याण-डोंबिवली – प्रभाग २७ अ मधून भाजपच्या मंदा पाटील

6.कल्याण-डोंबिवली – प्रभाग २६ अ मधून भाजपचे मुकूंद पेडणेकर

7.कल्याण-डोंबिवली – प्रभाग २८ मधून भाजपचे महेश पाटील

8.कल्याण-डोंबिवली – प्रभाग क्र. १९(क) मधून भाजपाचे साई शिवाजी शेलार

vivek

Recent Posts