
Kashmira Police Latest News : 13 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह आरोपी महिला गजाआड; गुन्हे प्रकटीकरण शाखेची तांत्रिक तपासाद्वारे मोठी कामगिरी
मीरा-भाईंदर | निवडणुकीच्या धामधुमीत नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडत असताना, त्याचा फायदा घेऊन घरफोडी करणाऱ्या एका सराईत महिला आरोपीला मीरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखेने अटक केली आहे. काशिमीरा येथील पेणकरपाडा परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून तब्बल 13 तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उषाताई संजय कटारे (वय 40) या महिलेला पोलिसांनी रंगेहाथ मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
घटनेची हकीकत अशी की, 15 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी अनिता राजाभाऊ गंडले या आपल्या घराला कुलूप लावून वांद्रे येथे मतदानासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोराने त्यांच्या घराचा कपाटाचा लॉकर तोडून 7 लाख 8 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. मतदान करून घरी परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-1 च्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.
तपासादरम्यान ही घरफोडी उषाताई कटारे या महिला आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिला 17 जानेवारी रोजी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीला गेलेले सर्व 13 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत असून पुढील तपास काशिमीरा पोलीस करत आहेत.



