Karnataka Breaking News : अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकचे पोलीस महासंचालक निलंबित! आयपीएस रामचंद्र राव यांच्यावर राज्य सरकारची कठोर कारवाई

Karnataka DGP Latest News : अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह कृत्ये केल्याचा आरोप; भाजपकडून काँग्रेस सरकारवर कडाडून टीका; “माझी प्रतिमा मलिन करण्याचा कट” – राव यांचा दावा
ANI :- कर्नाटक पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि पोलीस महासंचालक (नागरिक हक्क अंमलबजावणी) रामचंद्र राव Karnataka DGP Ramchandra Rav यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, राज्य सरकारने त्यांना तातडीने निलंबित केले आहे. या व्हिडिओ क्लिप्समध्ये राव वेगवेगळ्या महिलांसोबत अश्लील कृत्ये करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे कर्नाटकच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी काँग्रेस सरकारला धारेवर धरले आहे.
सोमवारी या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होताच, त्याचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तातडीने कठोर कारवाईचे आदेश दिले. “सदर अधिकाऱ्याचे पद काहीही असले तरी, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील पावले उचलली जातील,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दुसरीकडे, निलंबनाची कारवाई होताच रामचंद्र राव यांनी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही.
“हा बनावट व्हिडिओ आणि जुना कट” माध्यमांशी बोलताना रामचंद्र राव यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “या व्हिडिओशी माझा कोणताही संबंध नाही, माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी हा रचलेला कट आहे. आजच्या काळात कोणाचाही बनावट व्हिडिओ तयार करणे शक्य आहे,” असे त्यांनी म्हटले. हे व्हिडिओ सुमारे आठ वर्षांपूर्वीचे म्हणजेच त्यांच्या बेळगावी येथील नियुक्तीच्या काळातील असण्याची शक्यता विचारली असता, त्यांनी पुन्हा एकदा आपला संबंध नाकारला. मात्र, सरकारने प्राथमिक तपासाच्या आधारे निलंबनाचा निर्णय घेतला असून चौकशी अहवालानंतर अंतिम कारवाई केली जाणार आहे.
भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल या प्रकरणावरून भाजपने कर्नाटक सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, “काँग्रेसच्या राजवटीत कर्नाटकमध्ये महिलांची सुरक्षा अत्यंत खालावली आहे. जर सार्वजनिक कार्यालयात अशा घटना घडत असतील, तर सामान्य महिलांच्या सुरक्षेचे काय?” या प्रकरणामुळे आता कर्नाटकात पोलीस प्रशासनाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



