मुंबई

Worli BDD Chawl News : वरळीत नव्या पर्वाची पहाट! बीडीडी चाळ रहिवाशांना मिळाली स्वप्नातील ‘2BHK’ घरांची किल्ली

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत चावी वाटपाचा कार्यक्रम; आदित्य ठाकरे यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती

मुंबई :- एकेकाळी मुंबईच्या ओळखीचा भाग असलेल्या वरळीच्या बीडीडी चाळी आता इतिहासजमा होणार आहेत. जीर्ण झालेल्या चाळींच्या जागी गगनचुंबी टॉवर्स उभे राहणार असून, पहिल्या टप्प्यातील 16 रहिवाशांना आज त्यांच्या प्रशस्त आणि आलिशान घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. हा सोहळा केवळ घरवाटपाचा नसून, चाळीतील जीवनशैलीचा चेहरामोहरा बदलून, मुंबईच्या शहरी नूतनीकरणात एक नवे पर्व सुरू करणारा ठरला आहे.

40 मजली इमारतीत, 500 चौरस फुटांच्या घरातून दिसणार अरबी समुद्राचे विहंगम दृश्य

हा पुनर्विकास प्रकल्प केवळ जुन्या घरांच्या बदल्यात नवीन घरे देत नाही, तर रहिवाशांना एक उन्नत जीवनशैली देत आहे. पूर्वी 160 चौरस फूट छोट्या खोलीत राहणाऱ्या कुटुंबांना आता 500 चौरस फूट चटईक्षेत्राचा प्रशस्त २BHK फ्लॅट मिळणार आहे. विशेष म्हणजे, या 40 मजली इमारतींच्या उंच मजल्यांवरून रहिवाशांना अथांग अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) हाती घेतलेला हा आशियातील सर्वात मोठा शहरी नूतनीकरण प्रकल्प असून, यामुळे एकूण 9,689 कुटुंबांचे जीवनमान पूर्णपणे बदलणार आहे.

यशवंतराव नाट्यमंदिरात झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. मात्र, हा प्रकल्प ज्या मतदारसंघात येतो, त्या वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. महाविकास आघाडीच्या काळात सुरू झालेल्या या कामाचा आनंदोत्सव भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट) सरकारने साजरा केला. भाषकांच्या यादीत नाव नसल्याने आदित्य ठाकरे नाराज असल्याची कुजबुज या कार्यक्रमात ऐकायला मिळाली. त्यामुळे, घरांचा आनंद साजरा होत असतानाच, राजकीय वर्तुळात मात्र कटुतेचा सूर उमटल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0