Kalyan Tadipar News : कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी पाच तडीपार आरोपींना केले जेरबंद

•मनाई आदेश भंग करणाऱ्या पाच तडीपार आरोपींना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे, 18 महिन्यासाठी केले होते तडीपार
कल्याण :- सराईत गुन्हेगार असलेल्या पाच आरोपींना 01 ऑक्टोंबर 2022 मध्ये पोलीस उप आयुक्त परिमंडळ -3, कल्याण यांनी 18 महिन्याच्या कालावधी करिता तडीपार केले होते. या पाचही आरोपींना ठाणे,मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातून हद्दपार केले होते.
खडकपाडा पोलिसांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या पाच आरोपींना 18 जुलै दु.2.45 वाजल्याच्या दरम्यान कल्याण पश्चिमेतून अटक करण्यात आली आहे. आरोपी महेश कृष्णा भोईर, विठ्ठल कृष्णा भोईर, रोहन रमेश ठाकरे, जगदीश हरी भांबरे, नितेश लक्ष्मण भोईर हे सर्व आरोपी सापाड रोड कल्याण पश्चिम येथे राहणारे आहे. यांना विविध गुन्ह्यांखाली पोलिसांनी 18 महिन्याच्या कालावधी करिता हद्दपार केले होते. परंतु पोलीस आयुक्त ठाणे शहर, आशुतोष डुंबरे आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ -03, कल्याण यांची कोणतीही परवानगी न घेता हे पाचही आरोपी शहरांमध्ये सर्रास वावरत होते. खडकपाडा पोलिसांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून पाचही आरोपींना कल्याण पश्चिम येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचही आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जीसी पाटील हे करत आहे.