
Sushma Andhare On Eknath Shinde : साताऱ्यातील ड्रग्ज साठ्याला ‘हॉटेल तेजयश’मधून पुरवले जायचे जेवण; पोलिसांकडून माहिती दडवल्याचा दावा
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून देणारा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. सातारा जिल्ह्यातील सावरी गावात सापडलेल्या 145 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलशी जोडलेले असल्याचा गंभीर आरोप अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून जाणीवपूर्वक माहिती लपवण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काय आहे ड्रग्ज प्रकरण?
13 डिसेंबर रोजी सावरी गावातील एका पत्र्याच्या शेडवर मुंबई पोलिसांनी धाड टाकली होती. या कारवाईत तब्बल 45 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे. या शेडचा मालक गोविंद सिंदकर असून, ओंकार दिघे नावाच्या व्यक्तीने या शेडची चावी घेतली होती. विशेष म्हणजे, या दुर्गम भागात जेथे मानवी वस्ती नाही, तिथे 75 लाख रुपये खर्च करून रस्ता कोणासाठी बनवला? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
थेट प्रकाश शिंदेंवर निशाणा
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक माहिती देताना सांगितले की, “ज्या शेडमध्ये ड्रग्ज सापडले, तिथे काम करणाऱ्या तीन संशयितांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या ‘हॉटेल तेजयश’ मधून जेवण पुरवले जात होते. हे तीन कामगार आसामी किंवा बांगलादेशी असावेत असा संशय आहे. या साध्या कामगारांना पंचतारांकित हॉटेलमधील जेवण कोण आणि का पुरवत होते? याचे उत्तर मिळाले पाहिजे.”
पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या प्रकरणातील महत्त्वाची माहिती लपवून ठेवली आणि एफआयआर (FIR) ऑनलाइन का दिसत नाही? असा प्रश्न अंधारे यांनी विचारला. ज्या तीन लोकांची नावे एफआयआरमध्ये असायला हवी होती, ती गायब का आहेत? असा आरोप करत त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
“एखाद्या प्रकरणात मुलाचे नाव आले तर बापाचा राजीनामा मागितला जातो, मग आता ड्रग्ज प्रकरणात सख्ख्या भावाचे नाव आणि हॉटेलचे नाव समोर आल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा का घेतला जाऊ नये?” असा टोकदार सवाल अंधारे यांनी केला. तसेच, हे प्रकरण उघड केल्यामुळे आपल्या जीवाला धोका असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सुरक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.


