मुंबई

Kalyan Sex Racket Busted : कल्याणमध्ये ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, महिला दलाल पोलिसांच्या जाळ्यात

•शहाड रेल्वे स्टेशन परिसरातून एका महिलेला अटक, अल्पवयीन मुलीची सुटका

कल्याण :- कल्याण शहरात मानवी तस्करी आणि देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTC) पर्दाफाश केला आहे. शहाड रेल्वे स्टेशन परिसरातून एका महिला दलालाला अटक करण्यात आली असून, तिच्या तावडीतून एका पीडित तरुणीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शहाड रेल्वे स्टेशनजवळ एक महिला मोबाईलवर मुलींचे फोटो पाठवून देहव्यापारासाठी मुली पुरवण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून बनावट ग्राहक पाठवले. ही महिला मुलीची डील करण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी पीडित तरुणीलाही ताब्यात घेतले असून, तिला सुरक्षितपणे महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ही महिला दलाल कल्याण शहरात गुप्तपणे देहविक्रीचा व्यवसाय चालवत होती. पोलिसांनी तिच्यावर भारतीय न्याय संहिता आणि PITA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ठाणे शहर AHTC च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वालघुडे आणि AHTC च्या संपूर्ण टीमने संयुक्तपणे ही यशस्वी कारवाई केली.

vivek

Recent Posts