Thane Crime News : आदिवासी विभागातील दोन लाचखोर लिपिक ACBच्या जाळ्यात

•राज्यात लाचखोर अधिकाऱ्यांवर धडक कारवाई सुरू असून आज आदिवासी विभागाच्या दोन लिपिकाला अटक करण्यात आली आहे.
ठाणे :- राज्यामध्ये लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाईचे धडक सत्र सुरुच असून आदिवासी विकास विभागाचा ठाणे आणि शहापूर विभागातील वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर कनिष्ठ लिपिकाला पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार याचे आईचे वैद्यकिय बिलाची पडताळणी करुन बिलाची फाईल अंतीम मंजुरीकरीता विनाविलंब वरिष्ठांकडे सादर करण्याकरीता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर कार्यालयातील कनिष्ठ लिपीक हेमंत बाळकृष्ण किरपण यांनी तक्रारदार यांच्याकडे 23 हजार रुपयांचे लाच मागितली होती. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे कार्यालयातील वरिष्ठ लिपीक,हरिष दत्तात्रय मराठे यांच्याकडून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी यासंदर्भात 7 मार्च 2025 रोजी ठाणे एसीबी कार्यालयाला या संदर्भात तक्रार दाखल केली होती.
7 मार्च ते 11 मार्च करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे आईचे वैद्यकिय बिलांची पडताळणी करुन बिलाची फाईल अंतीम मंजुरीकरीता विनाविलंब वरिष्ठांकडे सादर करण्याकरीता तक्रारदार यांचेकडे 23 हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडअंती 15 हजार रूपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. हेमंत बाळकृष्ण किरपण, (कनिष्ठ लिपीक) यांना तक्रारदार यांचेकडून 15 हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. हरिष दत्तात्रय मराठे, (वरिष्ठ लिपीक) यांना ही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांविरोधात पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई चालू असल्याचे पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी माहिती दिली आहे.