Kalyan News : कल्याण बाजार समितीवर महायुतीचा विजयध्वज, 18 पैकी 15 जागा पटकावल्या

•महाविकास आघाडीचा केवळ एक सदस्य विजयी; दोन अपक्ष उमेदवारांनीही मारली बाजी
कल्याण :- राज्यातील महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत 18 पैकी तब्बल 15 जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकच जागा मिळाली असून दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून या निवडणुकीसाठी तत्पर रणनीती आखण्यात आली होती. भाजप आमदार किसन कथोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी या निवडणुकीला प्रतिष्ठेचे रूप दिले होते. महायुतीच्या नेत्यांनी प्रचारात आक्रमक भूमिका घेतली आणि प्रतिस्पर्ध्यांना जवळपास मैदानाबाहेर ढकलले.
विजयी उमेदवारांची यादी अशी
1.सर्वसाधारण गट : रवींद्र घोडविंदे, कपील थळे, भरत गोंधळी, योगेश धुमाळ, अरुण पाटील, जालिंदर पाटील, मनोरमा पाटील
2.महिला गट : विद्या अरुण पाटील, शारदा हरिश्चंद्र पाटील
3.इतर मागासवर्गीय गट : वसंत लोणे
4.भटक्या विमुक्त जाती गट : रवींद्र आव्हाड
5.ग्रामपंचायत गट : नरेश सुरोशी, रवींद्र भोईर, किशोर वाडेकर
6.आर्थिक दुर्बल गट : विजय सुरोशी
7.व्यापारी गट : काशिनाथ नरवडे, गिरीश पाटील
एकूण 53 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यातून केवळ 18 उमेदवार विजयी झाले. या लढतीत बाजार समितीचे काही माजी संचालक – मयूर पाटील, मधुकर मोहपे, शाहित मुल्ला, मोहन नाईक आणि भूषण जाधव – यांना पराभव पत्करावा लागला. यामागे दोन वर्षांपूर्वी आमदार कथोरे यांच्यासोबत झालेल्या कुरघोडीचा परिणाम असल्याची चर्चा आहे.
244 सहकारी संस्थांचे मतदार, 331 ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि 1783 व्यापारी अडते मतदारांपैकी सुमारे 1400 मतदारांनी मतदानात भाग घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधवर यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
बाजार समितीची एकूण उलाढाल सुमारे 110 कोटी रुपये इतकी असून, निवडून आलेल्या संचालकांपुढे यापुढे आर्थिक आणि शेतकऱ्यांशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेण्याचं मोठं आव्हान असणार आहे.


