Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनंतर तुरुंगातून सुटका

•Arun Gawli Free From Jail : मुंबईच्या शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
नागपूर :- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची 18 वर्षांच्या कारावासानंतर अखेर आज नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. माध्यमांपासून दूर, मागच्या गेटने गवळीला बाहेर काढण्यात आले.
नागपूर पोलिसांच्या सुरक्षेत मुंबईकडे रवाना
गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने अरुण गवळीला जामीन मंजूर केला होता, मात्र जामिनासाठीच्या अटी व शर्ती मुंबई सत्र न्यायालय निश्चित करेल असे स्पष्ट केले होते. मुंबई सत्र न्यायालयातून जामिनाची ऑर्डर नागपूर कारागृहात आल्यानंतर आज त्याला मुक्त करण्यात आले. नागपूर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्थेत गवळीला नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत आणले. त्यानंतर तो विमानाने मुंबईकडे रवाना झाला.
कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण
2007 मध्ये मुंबईतील घाटकोपर येथील आपल्या निवासस्थानी कमलाकर जामसांडेकर यांची भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गवळी मागील 18 वर्षांपासून जामिनासाठी प्रयत्न करत होता, अखेर त्याला यश मिळाले.



