Kalyan Crime News : ‘माझ्याकडे का बघतोस?’ या क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांमध्ये तुफान हाणामारी

Kalyan Latest Crime News : कल्याणमध्ये समोसा दुकानात घडला प्रकार, एकाचा हात जखमी; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण :- कल्याण पूर्वेतील म्हात्रे नाका येथे एका समोसा दुकानात ‘माझ्याकडे रोखून का बघतोस?’ या क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाली. या भांडणात एका तरुणाच्या हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

नेमका प्रकार काय?

कल्याणातील हनुमाननगर येथे राहणारा शिवम शशिकांत दुबे (नोकरी करतो) हा म्हात्रे नाका येथील एका मिठाईच्या दुकानात समोसे घेण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्याला ओळखीचा असलेला सुजित म्हात्रे तिथे आला. शिवमने सुजितला बघितले असता, सुजितने त्याला “तू माझ्याकडे रोखून काय बघतोस?” अशी विचारणा केली. शिवमने आपण काहीही करत नसल्याचे सांगितले, मात्र सुजितने त्याला शिवीगाळ सुरू केली.

शिवमने शिवीगाळ न करण्यास सांगितले असता, संतापलेल्या सुजितने त्याला थोबाडीत मारली आणि नंतर ठोशाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. दुकानात ग्राहक आणि कामगार उपस्थित असताना हा प्रकार घडल्यामुळे एकच गोंधळ उडाला. सुरुवातीला कोणीही भांडण सोडवण्यासाठी पुढे आले नाही.
गंभीर दुखापत आणि गुन्हा दाखल
या मारहाणीत सुजितने मारलेला एक जोरदार ठोसा शिवमच्या उजव्या हाताच्या पंजाला लागला. यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. नंतर काही नागरिकांनी मध्यस्थी करून त्यांचे भांडण सोडवले. या घटनेनंतर शिवम दुबेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुजित म्हात्रेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार गाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

vivek

Recent Posts