क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Kalyan Crime News : ‘व्हॉट्सॲप ग्रुप’च्या नादात 13 लाखांना गंडा; उल्हासनगरमध्ये शेअर बाजारातील फसवणुकीचा नवा प्रकार उघडकीस

Kalyan Crime News : इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स पाहून गुंतवणूक वाढली, पण फसवे ‘आर्थिक सल्ले’ ठरू लागले धोकादायक

कल्याण :- समाज माध्यमांवर, विशेषतः इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्सवर, आकर्षक व्हिडिओ पाहून व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम समूहात सहभागी होत शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे काही जणांना तात्पुरता आर्थिक फायदा होत असला तरी, यातून मोठ्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला असून, येथील एका 31 वर्षीय व्यक्तीला तब्बल 13 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kalyan Latest Crime News

गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचा ओढा वाढला आहे. ऑनलाइन ॲप्स आणि समाज माध्यमांवरील ‘गुंतवणूक तज्ज्ञांचे’ सल्ले अनेक जण सर्रास वापरत आहेत. हे तथाकथित तज्ज्ञ व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर समूह तयार करून ‘इंट्राडे ट्रेडिंग’पासून ते कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत, याबाबत रोज सकाळी सल्ले देतात. अनेकदा, या सल्ल्यांमुळे फायदा झालेल्या लाभार्थ्यांचे व्हिडिओही प्रसारित केले जातात, ज्यात कोणताही अतिरिक्त शुल्क आकारले जात नसल्याचं सांगून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला जातो. मात्र, याच विश्वासार्हतेचा फायदा घेत उल्हासनगरमधील भावेश मुलचंदाणी यांना मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून फसवलं गेलं.

उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात राहणारे भावेश मुलचंदाणी हे ‘सी 07 3600 एनई’ नावाच्या व्हॉट्सॲप समूहात होते. या समूहातील ‘आरोही पाटील’ नावाच्या व्यक्तीने त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असं आमिष दाखवलं. त्यानंतर, या अनोळखी व्यक्तीने भावेश यांना ‘360 एचएनडब्ल्यू’ नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. या व्यक्तीच्या सांगण्यावरून भावेश यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण 13 लाख 78 हजार रुपये पाठवले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तात्काळ उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

यापूर्वीही उल्हासनगर, बदलापूर आणि आसपासच्या परिसरात शेअर बाजारात फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. उल्हासनगरमध्येच एका महिलेची 34 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली होती, तर बदलापूरमध्ये एका शिक्षिका आणि एका गृहिणीची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद आहे. ‘एक का डबल’ सारखी फसवी आमिषे दाखवून अनेक जण फसवले जात आहेत. कोणत्याही संस्थेकडून नियमबाह्य पद्धतीने अधिकचा परतावा मिळू शकत नाही, असं गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. पोलिसांनी वारंवार नागरिकांना आवाहन केलं आहे की, गुंतवणूक करण्यापूर्वी विश्वासार्ह स्त्रोत तपासावेत आणि त्याची खात्री केल्याशिवाय पैसे गुंतवू नयेत. असे गुन्हे समोर येत असतानाही नागरिक अजूनही फसव्या आमिषांना बळी पडत असल्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0