JNPA News : अवैध पार्किंग आणि अवैध बांधकामांवर जेएनपीए करणार कडक कारवाई : उन्मेश वाघ

उरण : आशिया खंडात असलेले एक महत्त्वाचे बंदर म्हणजे जेेएनपीए JNPA बंदर होय.याच बंदराच्या रस्त्यांवर अवैध वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर जेएनपीए आत्ता कडक धोरण राबविणार असून या वाहन धारकांचा जेएनपीएतील परवानाच रद्द करण्यात येणार आहे. JNPA strict measures against illegal parking and constructions त्याच प्रमाणे जेएनपीएच्या जागांवर जी अवैध बांधकामे झाली आहेत ती बांधकामे देखिल १५ ऑगस्ट नंतर तोडण्यात येतील असे जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना उन्मेष वाघ यांनी जेएनपीए परिसरात पार्किंगची व्यवस्था असताना देखिल काही वाहने जाणून बूजून रस्त्यावर उभी करण्यात येतात त्यामुळे वाहतूकीला अडथळा येतो आणि जेएनपीएची प्रतिमा मलिन होते. जेएनपीएने नव्याने अनेक सुसज्ज रस्ते बनविले आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायमची दुर झाली आहे. जेएनपीएने अवजड वाहने पार्क करण्यासाठी मोठ मोठाले पार्किंग बनविलेल्या आहेत आणि त्या पार्किंगमध्ये सगळ्या सुविधा असताना देखिल काही वाहनचालक रस्त्यावर वाहने उभी करत आहेत. त्याच प्रमाणे जेएनपीएच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकामे केली आहेत आणि त्या ठिकाणी अवैध धंदे होत असल्यामुळे ही अतिक्रमणे लवकरच तोडण्यात येणार असल्याची माहिती उन्मेष वाघ यांनी दिली .
त्याच प्रमाणे जेएनपीए बेलपाडा गावाच्या पाठीमागून ते अटल सेतू पर्यंत एक नवा पर्यायी रस्ता बनविणार असून त्यामुळे जुन्या मार्गांवरील वाहतूक कमी होणार आहे. जेएनपीए २५ एकर जागेवर शेती मालावर प्रक्रिया केंद्र उभारणार असून या भागातील निर्यातक्षम शेती मालावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करणार आहे. या साठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळा आदी राज्यांतील शेती उत्पादनाचा अभ्यास केला असल्याचेही उन्मेष वाघ यांनी सांगितले.यावेळी जेएनपीए बंदराचे अधिकारी उपस्थित होते.