मुंबईठाणे
Trending

Riteish Deshmukh on Ravindra Chavan : “लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही!”; विलासरावांवरील टीकेला रितेश देशमुखचं सणसणीत उत्तर; लातूरमध्ये राजकीय वाद पेटला

Riteish Deshmukh on Ravindra Chavan : रवींद्र चव्हाणांच्या ‘आठवणी पुसण्याच्या’ विधानावर रितेशचा पलटवार; काँग्रेस आक्रमक, भाजपला दिला ‘सत्तेच्या माजा’वरून इशारा

मुंबई | लातूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका विधानाने लातूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील,” असे विधान चव्हाणांनी प्रचार सभेत केले होते. या विधानाला रितेश देशमुख याने अत्यंत संयमित पण तितक्याच प्रभावी शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

रितेश देशमुखचा खणखणीत व्हिडिओ

मंगळवारी सकाळी रितेशने एक व्हिडिओ शेअर करत रवींद्र चव्हाणांना आरसा दाखवला. व्हिडिओमध्ये दोन्ही हात वर करून रितेश म्हणाला, “लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र!” रितेशच्या या मोजक्या पण धारदार शब्दांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आले असून सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठा पाठिंबा मिळत आहे.

रवींद्र चव्हाण काय म्हणाले होते?

लातूर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सभेत बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले होते की, “लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा आहे. हा उत्साह पाहता लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात आता कोणतीही शंका उरलेली नाही.” या विधानानंतर लातूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रवींद्र चव्हाणांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूरमध्ये येऊन बरळत आहेत. विलासरावांचे लातूरकरांसोबत असलेले नातं त्यांना काय समजणार? स्वाभिमानी लातूरकर भाजपला त्यांची जागा दाखवून देतील. भाजपवाल्यांनो लक्षात ठेवा, या विधानाचा ‘करारा जवाब’ मिळेल!”

लातूरकरांच्या भावनांना हात

लातूरमध्ये विलासराव देशमुख यांचा आदर केवळ राजकारणी म्हणून नाही, तर ‘लातूरचे शिल्पकार’ म्हणून केला जातो. त्यामुळेच रवींद्र चव्हाणांचे हे विधान भाजपला निवडणुकीत महागात पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0