क्राईम न्यूज

Jishan Siddique : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दीकी यांना धमकी देणाऱ्याला अटक

Jishan Siddique News : दाऊदच्या नावावर 10 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप; पोलिसांकडून गुन्हेगारी टोळीशी संबंधाचा तपास सुरू

मुंबई :- माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी Jishan Siddique यांना धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या मोहम्मद दिलशाद नावेद या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने Mumbai Crime Branch अटक केली आहे. त्रिनिदाद अँड टोबॅगोमधून मुंबई विमानतळावर दाखल होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात ‘लुक आऊट सर्क्युलर’ जारी करण्यात आले होते.

झिशान सिद्दीकी यांना 21 एप्रिल रोजी त्यांच्या ई-मेल आयडीवर धमकीचा ई-मेल आला होता. त्यानंतर दोन दिवसांत त्यांना अनेक ई-मेल पाठवण्यात आले. त्यात आरोपीने 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती आणि दाऊद टोळीच्या नावाचा उल्लेख केला होता. यानंतर झिशान यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता.

यापूर्वीही बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर ऑक्टोबर महिन्यात झिशान आणि अभिनेता सलमान खान यांना धमकीचे फोन आले होते. निर्मल नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे, आरोपी मोहम्मद नावेदचा कोणत्या गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीच्या चौकशीतून या गुन्ह्यांमागे काही मोठा कट आहे का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने, त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे झिशान सिद्दीकी यांनाही मोठ्या मानसिक दबावाला सामोरे जावे लागले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मूळ सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

vivek

Recent Posts