पुणे

Jayant Narlikar Death : भारतीय विज्ञानाचा तेजस्वी तारा निखळला: डॉ. जयंत नारळीकर यांना अखेरचा निरोप

•Dr Jayant Narlikar Passed Away ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी आयुष्य वेचणाऱ्या नारळीकरांनी वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यात दिला मोलाचा वाटा

पुणे :- भारतीय खगोलशास्त्र आणि विज्ञान क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन ही देशासाठी एक अपूरणीय हानी ठरली आहे. विज्ञानाला समर्पित असलेले त्यांचे संपूर्ण आयुष्य हा नव्या पिढीला दिशा देणारा दीपस्तंभ ठरला आहे.

डॉ. नारळीकर हे केवळ वैज्ञानिक नव्हते, तर विज्ञानवादी विचारांचे झुंजार प्रचारकही होते. त्यांनी ‘आयुका’ (आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्र) ही संस्था स्थापन करून देशात खगोलशास्त्राचा प्रसार केला. स्थूलविश्वाच्या उत्पत्तीविषयी त्यांनी मांडलेली ‘क्वासी स्टेडी स्टेट थिअरी’ ही जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या संशोधनाने त्यांना आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जगतात मानाचं स्थान मिळवून दिलं.

शाळकरी मुलांपासून ते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापर्यंत त्यांनी विज्ञान सहज भाषेत समजावून सांगितलं. त्यांच्या विज्ञानवादी भाषणांनी अंधश्रद्धेवर घणाघात केला. ‘महाराष्ट्रभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ यांसारख्या सन्मानांनी गौरवण्यात आलेले डॉ. नारळीकर आज नाहीत, ही बाब संपूर्ण देशासाठी दुःखद आहे.

देशातील विज्ञानप्रसाराचं काम आणि वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याचं कार्य त्यांनी जेवढ्या प्रामाणिकपणे केलं, ते पुढे नेणं हीच त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल. अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

vivek

Recent Posts