Ulhasnagar Breaking News: बेकायदेशीर होर्डिंग्ज, बॅनर्सला उल्हासनगर पालिकेचा ‘बुलडोझर’; उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर 13 गुन्हे दाखल

Ulhasnagar Latest News : पालिका निवडणुकांच्या तोंडावर हौशी इच्छुकांची बॅनरबाजी; प्रशासकांकडून कठोर कारवाईचे आदेश
उल्हासनगर :- शहरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या जाहिरात फलक, होर्डिंग्ज आणि बॅनर्सवर उल्हासनगर महानगरपालिकेने अखेर धडक कारवाई सुरू केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत सुरू असलेली ही अनधिकृत जाहिरातबाजी थांबवण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी 13 गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे बेकायदेशीर फलकबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. Municipal Action Against Banner Nuisance Ulhasnagar
उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन
गेल्या काही दिवसांपासून आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात बेकायदा फलकबाजी वाढली होती. स्वस्त बॅनर छपाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर शहरात हे तंत्रज्ञान सहज उपलब्ध असल्याने इच्छुकांकडून कोणत्याही प्रसंगाला बॅनर लावले जात होते. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 155/2011 मध्ये कोणत्याही प्रकारचा विनापरवानगी जाहिरात फलक लावू नये असे स्पष्ट आदेश दिले होते. तरीही या आदेशांचे उल्लंघन सुरूच होते.
आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई
उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशांनंतरही शहरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर फलकबाजीची गंभीर दखल घेत पालिका प्रशासक तथा आयुक्त यांनी संबंधित विभागांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात उल्हासनगर पोलीस ठाण्यात 6, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात 2 विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात 3 आणि हिललाईन पोलीस ठाण्यात 2 गुन्ह्यांचा समावेश आहे.
या कारवाईमुळे आतातरी शहरात होणारी बेकायदा जाहिरातबाजी थांबेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


