भारताचा दणदणीत विजय! – तिसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने मात; मालिकेत 2-1 ने आघाडी

Ind vs Sa 3rd T-20 : गोलंदाजांची भेदक कामगिरी; कुलदीप-अर्शदीपची कमाल; अभिषेक शर्मा-शिवम दुबेचा आक्रमक खेळ
Ind vs Sa 3rd T-20 :- भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर 7 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियम, धर्मशाळा येथे झालेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले, ज्यामुळे त्यांना 20 षटकांत केवळ 117 धावांपर्यंतच मजल मारता आली Ind vs Sa 3rd T-20 Match Update
दक्षिण आफ्रिकेची निराशाजनक फलंदाजी
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांचे सलामीवीर रिझा हेंड्रिक्स (0), क्विंटन डी कॉक (1) आणि डेवाल्ड ब्रेविस (2) झटपट बाद झाले. कर्णधार एडन मार्करम याने एकट्याने झुंज देत 46 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 61 धावांची उत्कृष्ट खेळी केली. डोनावन फरेरा (20) आणि नॉर्किया (12) यांनी त्याला थोडी साथ दिली, पण संघ केवळ 117 धावाच करू शकला.
भारताची भेदक गोलंदाजी
भारताकडून गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत आफ्रिकेच्या फलंदाजीची कंबर मोडली. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनीही 1-1 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह या सामन्यात अनुपस्थित असल्याने हर्षित राणाला संधी मिळाली होती, जी त्याने चांगली साधली.
भारताचा सहज पाठलाग
118 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात धडाकेबाज झाली. अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत आक्रमकतेचा संदेश दिला. त्याने 18 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारांसह 35 धावा ठोकल्या. शुभमन गिलने (28 धावा) त्याला चांगली साथ दिली.
मध्यक्रमात सूर्यकुमार यादव (12) लवकर बाद झाला, पण त्यानंतर आलेल्या शिवम दुबेने आणि तिलक वर्माने (25 धावा, नाबाद) सावधगिरीने खेळ करत संघाला विजयाजवळ नेले. शिवम दुबेने 16व्या षटकात एक चौकार आणि एक षटकार लगावत भारताचा विजय निश्चित केला. भारताने 16.5 षटकांत 3 गडी गमावून सामना सहज जिंकला.दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को यान्सन आणि कार्बिन बॉश यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.



