Indian Women Cricket Team : मिशन वर्ल्ड कप’ यशस्वी! हरमनच्या फौजेतील ‘या’ 5 वाघिणींनी रचला इतिहास

Dipti Sharma Player Of The Tournament : दीप्ती शर्मा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’; 2 वेळा हुकलेला विश्वचषक भारताने तिसऱ्या प्रयत्नात जिंकला!
Women cricket india world cup winner :- हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक 2025 जिंकून देशासाठी मोठा इतिहास रचला आहे. दोन वेळा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतरही भारतीय संघाने जिद्द सोडली नाही आणि घरच्या मैदानावर (डी. वाय. पाटील स्टेडियम) दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत अखेर आयसीसी विश्वचषकावर आपले नाव कोरले. या ‘मिशन वर्ल्ड कप’मध्ये संपूर्ण संघाने चमकदार कामगिरी केली, पण विजयात पाच खेळाडूंनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताची स्टार ऑल राऊंडर खेळाडू दीप्ती शर्मा ही या विश्वचषकात भारताची सर्वात मोठी शिलेदार ठरली आहे. तिला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणूनही गौरवण्यात आले. तिने संपूर्ण स्पर्धेमध्ये 215 धावा केल्या आणि सर्वाधिक 22 विकेट्स घेतल्या. अंतिम सामन्यातही तिने ५८ चेंडूंमध्ये 59 धावा केल्यावर, गोलंदाजीत 5 बळी घेत संघाला विजय मिळवून दिला. तिच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी तिला सामनावीरही निवडण्यात आले.
सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने अंतिम सामन्यात तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. तिने 78 चेंडूंमध्ये 87 धावा करत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीला सुरुवातीलाच धक्का दिला. गोलंदाजीतही तिने 2 बळी घेत दीप्तीला चांगली साथ दिली.
भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने शेफाली वर्मासोबत मिळून भारताला दमदार सुरुवात मिळवून दिली. अंतिम सामन्यात तिने 45 धावांची खेळी केली. मंधाना स्पर्धेत 9 सामन्यांत 434 धावा (54.24 सरासरी) करत सर्वाधिक धावा करणारी दुसरी फलंदाज ठरली.
भारतीय संघाची ‘फिनिशर’ ऋचा घोषने उपांत्य फेरीनंतर अंतिम सामन्यातही महत्त्वपूर्ण खेळी केली. तिने अंतिम षटकांमध्ये वेगाने 24 चेंडूंमध्ये 34 धावा जमवल्या, ज्यामुळे भारत 298 धावांपर्यंत पोहोचू शकला.
याशिवाय, श्री चरणी हिने आपल्या प्रभावी फिरकी गोलंदाजीने मिडल ओव्हर्समध्ये 9 सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या. तर, अमनजोत कौरने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वूल्व्हडार्टचा निर्णायक झेल पकडून सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. या सर्व खेळाडूंच्या सांघिक कामगिरीमुळे 2005 आणि 2017 मध्ये हुकलेला विश्वचषक अखेर 2025 मध्ये भारताने जिंकून दाखवला.



