Indian Cricket Team Enters In Finals : महिला विश्वचषक : भारताची ऐतिहासिक कामगिरी! ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीत

•जेमिमा रोड्रिग्सचे नाबाद 127 धावांचे वादळ; महिला वनडे इतिहासातील सर्वात मोठा ‘रन चेस’ पूर्ण
नवी मुंबई :- आईसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा दुसरा उपांत्य सामना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. भारतीय महिला संघाने इतिहास रचत ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत (फायनल) प्रवेश निश्चित केला.
या विजयाची नायिका ठरली ती युवा फलंदाज जेमिमा रोड्रिग्स, जिने 127 धावांची अविश्वसनीय नाबाद खेळी केली.
सामन्याचा तपशील
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने निर्धारित षटकांमध्ये 338 धावांचा डोंगर उभारला होता. या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने जेमिमा रोड्रिग्सच्या दमदार शतकाच्या जोरावर 48.3 षटकांत 5 गडी गमावून हे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले.
यापूर्वी महिला वनडेमध्ये भारताचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग 265 धावांचा होता. आज भारताने आपलाच नव्हे, तर महिला वनडे इतिहासातील सर्वात मोठा ‘रन चेस’ पूर्ण करण्याचा विक्रम केला.
या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सुपरस्टार जेमिमा रोड्रिग्स दोघीही आपल्या भावना आवरू शकल्या नाहीत. जेमिमाला तिच्या शानदार कामगिरीबद्दल प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गौरविण्यात आले.
अंतिम सामना
आता अंतिम सामन्यात भारत आणि साउथ आफ्रिका यांच्यात 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतच सामना होणार आहे.


