
India France Aliases : दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त आणि वाहतूक निर्बंध; राफेल मरीन, हॅमर क्षेपणास्त्र आणि जेट इंजिन तंत्रज्ञानाबाबत जगाचे लक्ष
मुंबई | भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक संबंधांना एका नव्या उंचीवर नेणारा ऐतिहासिक सोहळा आज मुंबईत पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या या मुंबई दौऱ्यामुळे राजनैतिक वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. संरक्षण, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध आघाड्यांवर आज मुंबईत मैत्रीचा नवा ‘सुवर्ण अध्याय’ लिहिला जाण्याची शक्यता आहे.
मॅक्रॉन यांचे जंगी स्वागत आणि दौऱ्याचे नियोजन
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आज सकाळी उच्चस्तरीय शिष्टमंडळासह मुंबईत आगमन झाले. विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 2.15 वाजता मुंबईत दाखल होतील. त्यानंतर दुपारी 3.15 वाजता ‘लोकभवन’ (पूर्वीचे राजभवन) येथे दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक पार पडेल. या बैठकीत प्रामुख्याने हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षा आणि धोरणात्मक प्रगतीवर सविस्तर चर्चा होणार आहे.
गुंतवणूक आणि सांस्कृतिक सोहळा
सायंकाळी 5.15 वाजता हॉटेल ताजमहाल पॅलेस येथे दोन्ही नेते जगातील बड्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (CEOs) संवाद साधतील. या गोलमेज परिषदेत ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत नवीन गुंतवणूक आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे एका भव्य सांस्कृतिक सोहळ्याने ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष-2026 ‘ चे अधिकृत उद्घाटन होईल.
जगाचे लक्ष लागलेले महत्त्वाचे करार
या दौऱ्यात होणाऱ्या करारांमध्ये भारताच्या संरक्षण क्षमतेला मोठी उभारी मिळण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने:
भारतात हॅमर (Hammer) क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचा ऐतिहासिक निर्णय.
भारतीय नौदलासाठी राफेल मरीनच्या (Rafale Marine) किमतीबाबत अंतिम चर्चा.
टाटा-एअरबस प्रकल्पांतर्गत एअरबस H125 हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचे उद्घाटन.
जेट इंजिन आणि अत्याधुनिक पाणबुडी सहकार्याबाबत नवीन सामंजस्य करार.
आरोग्य सेवा क्षेत्रात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) आधारित सहकार्य.
वाहतुकीतील बदल आणि कडक बंदोबस्त
या व्हीव्हीआयपी दौऱ्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. दुपारी 2.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आणि शामा प्रसाद मुखर्जी चौक पूर्णपणे बंद राहतील. पी. रामचंदानी मार्गदेखील वाहतुकीसाठी बंद असून रिगल जंक्शनकडे जाणारी वाहने पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने जड वाहनांना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदी घातली आहे.



