IND VS PAK : भारत-पाक सामन्यानंतर वादंग : टीम इंडियाने हस्तांदोलन टाळल्याने पाकिस्तानला ‘मिरची झोंबली’

- शोएब अख्तरने व्यक्त केला संताप, ‘राजकीय रंग देऊ नका’, असा दिला सल्ला
Asia Cup 2025 :- आशिया चषक 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या साखळी सामन्यात भारतीय संघाने सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेले 128 धावांचे आव्हान भारताने 16 व्या षटकातच पार केले. मात्र, या विजयापेक्षाही सामन्यानंतर घडलेल्या घटनेची अधिक चर्चा आहे. भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळले, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हस्तांदोलन का टाळले?
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत अनेक भारतीयांची भावना आहे की, भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये. सरकारने बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिली असली, तरी देशभरातून या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या भारतीयांच्या भावनांचा आदर करत टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदानातही आपली भूमिका कायम ठेवली.
नाणेफेक: सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेकीच्या वेळीही कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हस्तांदोलन करणे टाळले.
सामना विजयानंतर: भारताचा विजय निश्चित झाल्यावर, विजयी षटकार ठोकणारे सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे एकमेकांना अभिनंदन करून थेट मैदानाबाहेर गेले. त्यानंतर भारतीय संघाचे सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेले आणि त्यांनी दरवाजा बंद करून घेतला.
यावेळी, पाकिस्तानचे सर्व खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी वाट पाहत उभे होते, पण भारतीय खेळाडू न आल्याने त्यांनाही आपल्या ड्रेसिंग रूममध्ये परतावे लागले.
शोएब अख्तरची प्रतिक्रिया
टीम इंडियाच्या या कृतीमुळे पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “भारतीय संघ चांगला खेळला. पण हा क्रिकेट सामना होता, त्याला राजकीय रंग देऊ नका. आम्ही तुमच्यासाठी चांगल्या गोष्टींबद्दल बोलत आहोत. हस्तांदोलन करा. हा क्रिकेटचा खेळ आहे. जर मी असतो तर नक्कीच हस्तांदोलन केले असते. मारामारी होतात, त्या घरीही होतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते वाढवत राहा.”



