IND Vs NAM T-20 WC : टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील ऐतिहासिक विजय! नामिबियाचा 93 धावांनी उडवला धुव्वा; हार्दिक-इशानची तुफानी बॅटिंग

•टी-20 वर्ल्ड कप इतिहासातील भारताचा सर्वात मोठा विजय; हार्दिक पंड्याची 52 धावांची ‘चाबूक’ खेळी आणि वरुण चक्रवर्तीची फिरकीची जादू
IND vs NAM T-20 World Cup :- टीम इंडियाने नामिबियावर एकतर्फी विजय मिळवत टी-20 वर्ल्ड कप इतिहासातील आपल्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. 210 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करताना दिसला. भारताने नामिबियाला 116 धावांवर रोखत सलग दुसरा विजय साकारला.
बॅटिंगमध्ये इशान आणि हार्दिकची फटकेबाजी
नामिबियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. सलामीवीर इशान किशनने 61 धावांची दमदार खेळी करत पाया रचला. मात्र, डावाचे खरे आकर्षण ठरला तो हार्दिक पंड्या. हार्दिकने अवघ्या 28 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 धावांची स्फोटक खेळी केली. संजू सॅमसन (22), शिवम दुबे (23) आणि तिलक वर्मा (25 ) यांनी मोलाची भर घातल्याने भारताने 9 गड्यांच्या मोबदल्यात 209 धावांपर्यंत मजल मारली.
वरुण चक्रवर्तीची फिरकी आणि गोलंदाजांचा सांघिक मारा
210 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या नामिबियाची सुरुवात समाधानकारक झाली होती. मात्र, ठराविक अंतराने भारताने धक्के देण्यास सुरुवात केली. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 बळी घेत नामिबियाचे कंबरडे मोडले. अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले, तर अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
नामिबियाचा डाव गडगडला
नामिबियाकडून लॉरेन स्टीनकॅम्प (29) आणि जॅन फ्रायलिंक (22) यांनी थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय आक्रमणासमोर इतर फलंदाज तग धरू शकले नाहीत. नामिबियाला 10 चेंडू शिल्लक असतानाच 116 धावांवर ऑलआऊट व्हावे लागले.



