
Eknath Shinde Meet Dagdu Sapkal : गिरणगावात नाराजीचा सूर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, मात्र सकपाळ अन्य पक्षात जाण्यावर अद्याप साशंक
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) रणधुमाळीत ठाकरे गटाला दक्षिण मुंबईत मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गिरणगावात शिवसेनेचा (ठाकरे गट) आवाज बुलंद करणारे माजी आमदार आणि माजी विभागप्रमुख दगडू सकपाळ यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आता वयापरत्वे पक्षाला आपली गरज उरली नाही, अपमान करून घेण्यापेक्षा घरात बसणे पसंत करेन,” अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.
मुलीला उमेदवारी नाकारल्याने नाराजी
दगडू सकपाळ यांनी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी आपली मुलगी रेश्मा सकपाळ हिच्यासाठी उमेदवारीची मागणी केली होती. आपल्या हयातीत मुलीला नगरसेविका म्हणून पाहण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, पक्षाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने सकपाळ कुटुंबियात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. “गेल्या 15 वर्षांत पक्षाकडे काहीही मागितले नाही, तरीही पदरी निराशाच आली,” असे सकपाळ यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट आणि चर्चा याच नाराजीच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दगडू सकपाळ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे गिरणगावात राजकीय भूकंप होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, सकपाळ यांनी अद्याप दुसऱ्या पक्षात जाण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. “पक्षाने मला मोठे केले, पण आता जुन्या कार्यकर्त्यांना दणका दिला जात आहे,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
गिरणगावातील कडवट शिवसैनिक दुर्लक्षित?
दगडू सकपाळ हे शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाशी जोडलेले आहेत. 2004 ते 2013 या काळात त्यांनी आमदार म्हणून शिवडी-लालबाग भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या आंदोलनात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. अशा निष्ठावान नेत्याला डावलले जात असल्याचा सूर गिरणगावातील जुन्या शिवसैनिकांमध्ये उमटू लागला आहे.


