Mumbai Crime News : ‘प्रेमसंबंधाला विरोध’… भावाने बहिणीच्या 40 वर्षीय प्रियकराची केली निर्दयी हत्या

Mumbai Latest Crime News : मालाडमध्ये दिवसाढवळ्या घडली धक्कादायक घटना; आरोपीने स्वतःच पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले
मुंबई :- आपल्या बहिणीचे एका 40 वर्षीय व्यक्तीसोबत असलेले प्रेमसंबंध सहन न झाल्यामुळे एका 21 वर्षीय तरुणाने भरदिवसा त्याच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना मालाड येथे घडली आहे. आरोपीने स्वतः मालवणी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. Mumbai Latest Crime News
आशिष जोसेफ शेट्टी (21 वय) हा एक नृत्यदिग्दर्शक असून, त्याची बहीण एंजला जोसेफ (24 वय) हिचे जोगेश्वरी येथे राहणाऱ्या नितीन सोलंकी (40 वय) सोबत प्रेमसंबंध होते. नितीन वयस्कर आणि वेगळ्या धर्माचा असल्यामुळे आशिषचा या नात्याला तीव्र विरोध होता.
मालाडमध्ये थेट डोक्यात प्रहार
शनिवारी, 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता आशिषने नितीन सोलंकीला मालाडच्या मार्वे रोड खाडीजवळच्या टी जंक्शनवर बोलावले. ‘माझ्या बहिणीचा नाद सोड,’ असे सांगत आशिषने नितीनशी वाद घातला. वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि संतप्त झालेल्या आशिषने जवळ असलेल्या लाकडी दांड्याने नितीनच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या प्रहारामुळे नितीन बेशुद्ध होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.
हल्ल्यानंतर आरोपी पोलिसांसमोर हजर
नितीनला बेशुद्ध अवस्थेत सोडून आशिष थेट मालवणी पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि नितीनला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुपारी 2 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नितीनच्या आईने, जया सोलंकी (54 वय), यांनी पोलिसांकडे दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, आशिषचा आपल्या बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध होता, म्हणूनच त्याने नितीनची हत्या केली. मालवणी पोलिसांनी आशिष शेट्टी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.


