विशेष

‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’चा ऐतिहासिक सोहळा: डॉ. आंबेडकरांच्या महान धम्मक्रांतीला 69 वर्षे पूर्ण; नागपूरच्या दीक्षाभूमीवर लक्षावधी अनुयायांची गर्दी

Dhammachakra Pravartan Din 2025  : ‘हिंदू म्हणून मरणार नाही’ या संकल्पातून धर्मांतराचा दृढ निर्णय; मानसिक स्वातंत्र्य, समता आणि सन्मानासाठी आंबेडकरांनी स्वीकारला बौद्ध धम्म.

नागपूर :- बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला धम्मचक्र प्रवर्तन दिन (किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्रासह देशभरातील लक्षावधी बौद्ध अनुयायी या उत्सवासाठी नागपूरमधील दीक्षाभूमी येथे दाखल झाले आहेत. Dhammachakra Pravartan Din 2025 

या उत्सवाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. याच अशोक विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे 5,00,000 अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. आंबेडकरांनी पुन्हा गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केले, त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

धर्मांतरामागील वैचारिक भूमिका

डॉ. आंबेडकरांनी घेतलेला धर्मांतराचा निर्णय हा केवळ धार्मिक नसून, सामाजिक, तात्त्विक आणि आध्यात्मिक होता. त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे स्पष्ट केले होते की, “मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.”

धर्मांतरामागील आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले होते:

समानता आणि स्वातंत्र्य: “व्यक्तीचा विकास हेच धर्माचे खरे ध्येय आहे. हिंदू धर्मात व्यक्तीला प्राधान्य नसल्याकारणाने तो धर्म मला मान्य होऊ शकत नाही. व्यक्तीच्या विकासाकरिता सहानुभूती, समता आणि स्वातंत्र्य या तीन गोष्टींची आवश्यकता असते. हिंदू धर्मात या तिन्हीपैकी एकही बाब उपलब्ध नाही.”

मानसिक सामर्थ्य: जुलुमाला प्रतिकार करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, द्रव्यबल आणि मानसिक बल प्राप्त करण्यासाठी धर्मांतर आवश्यक आहे. “मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे,” असे त्यांचे ठाम मत होते. Dhammachakra Pravartan Din 2025 

दीक्षाभूमीवर जनसागर

इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस ‘अशोक विजयादशमी’ म्हणून ओळखला जातो. याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराचा सोहळा करण्याचे ठरवले होते.

दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध धम्म स्वीकारतात. सन 1957 पासून सुरू असलेल्या या सोहळ्याला देश-विदेशातील बौद्ध भिक्खू, उपासक आणि राजकीय व्यक्ती हजेरी लावतात. अनुयायी केवळ दीक्षाभूमीलाच नव्हे, तर नागपूर जिल्ह्यातील कामठीचे ड्रॅगन पॅलेस, नागलोक अशा बुद्धिस्ट सर्किटलाही भेट देतात.

डॉ. आंबेडकरांनी स्वीकारलेल्या बौद्ध धर्माने भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले, ज्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन हा आत्मसन्मान आणि समानतेचा एक राष्ट्रीय उत्सव बनला आहे.

vivek

Recent Posts