महाराष्ट्र

Hingoli Political News : हिंगोलीत राजकीय भूकंप! – शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या निवासस्थानी 100 पोलिसांचा छापा; भाजपवर ‘षडयंत्रा’चा गंभीर आरोप!

Hingoli Santosh Bangar Police Raid News : बीजेपी-शिंदे गटात तणाव शिगेला; आमदार हेमंत पाटलांचा दावा, ‘दहशतवाद्यासारखी’ रेड; उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल.

हिंगोली :- भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत तणावाच्या बातम्यांदरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या निवासस्थानी सुमारे 100 पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती आहे. हिंगोली नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत ही कारवाई झाल्याने शिंदे गटाने भाजपवर जाणूनबुजून षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या संतोष बांगर यांच्या घरावर ही मोठी कारवाई झाली. यापूर्वी शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी छापा मारल्याचा आरोप केला होता, त्या पाठोपाठ ही घटना घडल्याने महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

शिंदे गटाचे दुसरे आमदार हेमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगर यांच्या घरावर झालेली पोलीस कारवाई भाजपच्या स्थानिक आमदाराच्या दबावाखाली झाली आहे. पाटील यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबद्दल बोलणार आहेत.

हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे आमदार बांगर (शिवसेना) आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात संघर्ष सुरू आहे. हेमंत पाटील यांनी संताप व्यक्त करत म्हटले, “100 पोलीस कर्मचाऱ्यांनी पहाटे 5 वाजता बांगर यांच्या घरावर छापा टाकला आणि त्यांच्या 75 वर्षीय वृद्ध व आजारी आईला त्रास दिला, हे अत्यंत चुकीचे आहे.”

“दहशतवाद्यासारखी रेड”

हेमंत पाटील यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले. ते म्हणाले, “आमदाराच्या निवासस्थानी छापा टाकण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, याबाबत कोणतीही ऑर्डर किंवा मेल प्राप्त झालेला नाही. मग कोणाच्या आदेशावरून ही रेड झाली? भाजपचे आमदार मुटकुळे यांच्या दबावाखाली हे घडले आहे का?” त्यांनी या कारवाईची तुलना दहशतवादी किंवा गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तीवर टाकलेल्या छाप्याशी केली.

vivek

Recent Posts