Hingoli News : काँग्रेसला हिंगोलीत मोठा ‘धक्का’! – आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; उद्या होणार अधिकृत पक्षप्रवेश

Pragya Satav Joined BJP : राहुल गांधींचे विश्वासू सहकारी दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नीचा काँग्रेसला रामराम; हिंगोलीतील काँग्रेसचा अभेद्य गड धोक्यात; भाजपची मोठी राजकीय खेळी
मुंबई :-राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राहुल गांधींचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी, आमदार प्रज्ञा सातव या भारतीय जनता पार्टीत (भाजप) प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. उद्या हा पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता असून, यामुळे हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात काँग्रेसला मोठा तडा जाणार आहे.
राजीव सातव यांचा वारसा आणि काँग्रेसची स्थिती
हिंगोलीच्या राजकारणात राजीव सातव यांचे नाव आदराने घेतले जाते. 2014 च्या मोदी लाटेतही महाराष्ट्रातून निवडून आलेल्या दोन काँग्रेस खासदारांपैकी ते एक होते. पंचायत समिती ते राज्यसभा असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर हिंगोलीत काँग्रेसची पकड काहीशी ढिली झाली होती. आता त्यांच्या पत्नी आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदार प्रज्ञा सातव यांनीच भाजपची वाट धरल्याने काँग्रेसचा हा अभेद्य किल्ला ढासळण्याची चिन्हे आहेत.
भाजपकडून मोठ्या हालचाली
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रज्ञा सातव यांना पक्षात घेण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू होत्या. हिंगोली जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी हा एक महत्त्वाचा ‘मास्टरस्ट्रोक’ मानला जात आहे. प्रज्ञा सातव यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि सातव कुटुंबाचा वारसा लाभलेला चेहरा भाजपला मिळणार आहे.
कोण आहेत प्रज्ञा सातव?
प्रज्ञा सातव या काँग्रेसच्या विधान परिषद आमदार आहेत.
त्या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी असून सातव कुटुंबाचा राजकीय वारसा त्या पुढे नेत आहेत.
राजीव सातव हे गुजरात काँग्रेसचे प्रभारी आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले राष्ट्रीय स्तरावरील मोठे नेते होते.
प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे हिंगोली आणि मराठवाड्यात काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला मोठे खिंडार पडणार असून आगामी निवडणुकीत याचे गंभीर परिणाम पाहायला मिळू शकतात.


