ठाणे

Harshvardhan Sapkal: “राहुल नार्वेकरांनी संविधानाचा मर्डर केला, त्यांना तात्काळ बडतर्फ करा!”; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Harshvardhan Sapkal On Rahul Narvekar : निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह; ‘ए’ वॉर्डातील ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजवरून संशयाचे मळभ

मुंबई | महानगरपालिका निवडणुकीच्या Mumbai BMC Election निमित्ताने काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप-शिवसेना यांच्यातील संघर्ष आता टोकावर पोहोचला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. 30 डिसेंबर रोजी कुलाबा येथील निवडणूक कार्यालयात नार्वेकरांनी विरोधी उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रमुख आरोप

दबदबा आणि दमदाटी: “राहुल नार्वेकर हे एखाद्या मवाल्यासारखी दमदाटी करत आहेत. त्यांनी पोलिसांच्या मदतीने विरोधी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात जाण्यापासून रोखले, जेणेकरून त्यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून येतील,” असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला.

भ्रष्टाचाराचा त्रिकोण: सपकाळ यांच्या मते, या प्रकरणात आर्थिक, संविधानिक आणि प्रशासकीय अशा तिन्ही स्तरावर भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी नार्वेकरांना तात्काळ त्यांच्या पदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सीसीटीव्ही आणि पुराव्यांची लपवाछपवी: “ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, त्या ‘ए’ वॉर्डातील दुपारी ४ नंतरचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाला पुरावे मागितले असता त्यांनी पुराव्यांची मागणी करून हात झटकले आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

‘नोटा’ (NOTA) चिन्हाची मागणी

बिनविरोध निवडीच्या वाढत्या प्रकारावर भाष्य करताना सपकाळ म्हणाले की, “जर लोकशाही वाचवायची असेल, तर जिथे उमेदवार नाहीत तिथेही लोकांना मतदानाचा अधिकार मिळावा. अशा ठिकाणी ईव्हीएमवर ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून बिनविरोध निवडीचा बोगस खेळ थांबेल.”

संविधानिक पदाचा अवमान

राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून निष्पक्ष राहणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी पक्षपातीपणा करत संविधानाचा खून केला आहे. “त्यांना अध्यक्ष का केले? कारण त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करून सत्ताधाऱ्यांना मदत केली. हे आधार्मी कर्तृत्व त्यांच्या कपाळावर कायमचे गोंदवले गेले आहे,” अशा जळजळीत शब्दांत सपकाळ यांनी आपला निषेध नोंदवला.

आगामी पाऊल

निवडणूक आयोगाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असले, तरी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. नार्वेकरांच्या कार्यालयात काम करणारे अधिकारी आणि तिथली गुंडगिरी मोडीत काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago