मुंबईठाणे
Trending

Harshvardhan Sapkal : गुंड घायवळच्या भावाला परवाना: ‘भ्रष्ट मंत्र्यांच्या पाठिशी उभे राहणारे विचित्र मुख्यमंत्री राज्याला लाभले’ – काँग्रेस

Harshvardhan Sapkal On Yogesh Kadam : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची तात्काळ हकालपट्टी करा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

नाशिक :- पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला पुणे पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना (Arms License) मंजूर करण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याच्या प्रकरणावरून काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshvardhan Sapkal यांनी कदम यांची तात्काळ बडतर्फी करण्याची मागणी केली आहे.

नाशिकरोड येथे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे एकेक कदम उघडे होत आहेत,” असे नमूद केले.

‘हा मंत्री मंत्रिमंडळातून त्वरित बाहेर काढा’

योगेश कदम यांच्यावर टीका करताना सपकाळ यांनी त्यांच्या जुन्या वादग्रस्त घटनांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “गृहराज्यमंत्री एक नमुना आहे. त्यांच्या आईच्या नावावर डान्सबार चालतो, पोलिसांकडून छापा टाकल्यावर 22 तरुणींना पकडले जाते. आता त्यांचे हात थेट बंदुकीचा परवाना देण्यापर्यंत पोहोचले आहेत.” अशा बेताल व बेजबाबदार व्यक्तीला मंत्रिमंडळातून त्वरित बाहेर काढले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

‘भ्रष्ट माणसाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे मुख्यमंत्री’

याचवेळी सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केला. ते म्हणाले, “प्रत्येक भ्रष्ट माणसाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे, विचित्र कार्यपद्धतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला लाभले आहेत.”

सपकाळ यांनी माजी कृषीमंत्री माणिक कोकाटे यांचे उदाहरण दिले. “कोणी काहीही केले, कसेही वागले तरी त्याला बढती दिली जाते. माणिक कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त विधाने केली. परंतु, त्यांना मंत्रिमंडळातून काढण्याऐवजी प्रोत्साहन दिले गेले आणि रमी खेळाच्या विपणनासाठी क्रीडामंत्री करण्यात आले. याच धर्तीवर कदम यांनाही आता लवकरच बढती दिली जाईल,” असा टोला सपकाळ यांनी हाणला.

अखेरीस ते म्हणाले, “अशा विचित्र वागणाऱ्या सर्वांचा आका दुसरे, तिसरे कोणी नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, ते त्यांचे पाठिराखे आहेत.” त्यामुळे केवळ मंत्रीच नव्हे तर, सत्ताधारी आमदारही विचित्र पद्धतीने वागत असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0