मुंबई

Harshvardhan Sapkal : “गँग्स ऑफ ट्रिपल इंजिन सरकार”; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून काँग्रेसचा खोचक हल्लाबोल

Harshvardhan Sapkal On Eknath Shinde :हर्षवर्धन सपकाळ यांची टीका; मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार, आघाडीबद्दल स्थानिक पातळीवर निर्णय

नागपूर :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना सत्ताधारी महायुतीतील नाराजी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीवर ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटातील ‘टोळी युद्धा’चा संदर्भ देत खोचक टीका केली आहे.

नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी महायुतीच्या अंतर्गत वादावर भाष्य केले. “मनोज वाजपेयी यांच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या सिनेमाप्रमाणे राज्यात ‘गँग्स ऑफ ट्रिपल इंजिन सरकार’ सुरू आहे. सगळीकडे टोळी युद्ध चालू आहे आणि सत्तेचे राजकारण करण्यात सगळे गुंग आहेत,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडी होणार की नाही, यावरही सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसने आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते. याच अनुषंगाने, महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवाव्या, अशा पद्धतीची चर्चा आहे. विशेषतः मुंबईमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना स्वबळाची आहे आणि आम्ही त्या दिशेने पुढे जात आहोत, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीसारख्या संघटना सोबत येत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

नगपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जवळ आल्या असताना, महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांमध्ये समन्वय असला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. “आठ दिवसांपूर्वी आम्ही एकत्र बसलो होतो आणि नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी एकमेकांशी सलोख्याच्या भावनेने काम केले पाहिजे, हाच बैठकीचा आशय होता,” असेही सपकाळ यांनी सांगितले.

vivek

Recent Posts