मुंबई

Harshvardhan Sapkal : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मविआमध्ये मतभेद! “आम्हाला नव्या भिडूची गरज नाही” – काँग्रेसचा मनसेला स्पष्ट नकार

Harshvardhan Sapkal On MNS : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे थेट विधान; ‘स्थानिक पातळीवर वाटाघाटी होतील, मनसेला निमंत्रण नाही.’

मुंबई :- राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटातील संभाव्य युतीच्या चर्चांना जोर धरलेला असतानाच, महाविकास आघाडीमध्ये (मविआ) मात्र मतभेद उफाळून आल्याचे चित्र आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सपकाळ यांनी ‘काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही,’ असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मविआचे राजकीय गणित नेमके काय असणार, यावर चर्चा सुरू झाली आहे.

“मनसेला निमंत्रण मागायला कोण गेले होते?” – मनसेचा पलटवार

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत पलटवार केला. अभ्यंकर म्हणाले, “मुळात मनसेला महाविकास आघाडीत घ्या, अशी परवानगी मागायला काँग्रेस पक्षाकडे कोण गेले होते? आमच्याकडूनही त्यांच्याकडे कोणीही गेले नव्हते.”

त्यांनी स्पष्ट केले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी या कौटुंबिक स्वरूपाच्या आहेत आणि आमच्या पक्षाचा अंतिम निर्णय राज ठाकरे हेच घेतील.

ठाकरे गटाची सावध भूमिका

या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी सावध भूमिका घेतली. अहिर म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र विचारधारेचा आहे आणि त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. ते पुढे म्हणाले, “सपकाळ यांचे म्हणणे बारकाईने ऐकले तर लक्षात येईल की, त्यांनी युतीच्या निर्णयाबाबत स्थानिक स्तरावर चर्चा होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे कदाचित ठाण्यात आणि पुण्यात त्यांची भूमिका वेगळी असू शकते.”

मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिकमध्ये मराठी मतांचे विभाजन होऊ नये, ही ठाकरे गटाची भूमिका आहे. मात्र, काँग्रेस स्वबळावर लढणार का, याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असे अहिर यांनी सांगितले.

एकूणच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ‘मनसे’ला मविआत घेण्यावरून काँग्रेसने नकार घंटा वाजवल्याने महाविकास आघाडीतील निर्णय प्रक्रिया आता अधिक गुंतागुंतीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

vivek

Recent Posts