Ambadas Danve : बिहार निकालांवरून ठाकरे गटाचे दानवे संतप्त; “काँग्रेसची वृत्ती बदला!”, भाजपचीही टीका

•NDA 190+ जागांवर आघाडीवर; अंबादास दानवेंकडून काँग्रेसच्या जागावाटपाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून देशाचे लक्ष वेधून ठेवलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Result 2025) अखेर जाहीर होत असून, सुरुवातीच्या कलांनुसार भाजप आणि जदयूच्या एनडीए आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. एनडीए 193 जागांवर आघाडीवर असून, महागठबंधन 45 जागांवर पिछाडीवर आहे.
बिहारमधील या निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महाआघाडीच्या पराभवाचे खापर थेट काँग्रेस पक्षावर फोडले आहे.
दानवे यांचे काँग्रेसवर थेट टीकास्त्र
अंबादास दानवे म्हणाले की, “पराभव झालेला मान्य आहे, भाजपने सत्तेचा गैरवापर केलाय. पण या चुका काँग्रेस आणि आरजेडीनेही केल्या.” त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला, “काँग्रेस जागावाटपामध्ये मोठा वाटा मागते. विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, हे माझं मत स्पष्ट आहे. यामुळं नुकसान होते.”
तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला वेळ लागल्याने खूप उशीर झाला. “जी चूक महाराष्ट्रामध्ये झाली (उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित न करणे आणि जागावाटपाला उशीर), तीच बिहारमध्ये झाली. काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी.”दानवे यांच्या मते, जागावाटपाला अखेरच्या दिवसापर्यंत विलंब होत असेल, तर त्याचे परिणाम निकालावर होतात आणि काँग्रेसच्या मोठ्या वाटा मागण्याच्या वृत्तीमुळे आघाडीचे नुकसान होते.
बावनकुळे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
बिहारमधील सुमार कामगिरीनंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. बावनकुळे म्हणाले की, “काँग्रेस रोजच संपत आहे. राहुल गांधी हतबल झाले आहेत. फक्त मतदार यादीचे चुकीचे मुद्दे समोर करून वेळकाढूपणा करत आहे.”
ते पुढे म्हणाले, “विकासाचा कुठलाच अजेंडा त्यांच्याकडे नाही. धर्म, जात पंथाचे राजकारण करणे हेच काँग्रेसचे काम आहे. काँग्रेसच्या बुडत्या जहाजावर बसायला कोणी तयार नाही. आगामी काळात काँग्रेस इतिहासातील सर्वात छोटा पक्ष होईल.”


