क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

‘समृद्धी’वर सोन्याची लूट: चालकाच्या मदतीनेच व्यापाऱ्याला लुटले; 4.5 किलो सोने घेऊन दरोडेखोर पसार

Mumbai Latest Crime News : फ्रेश व्हायचंय’ असं सांगून चालकाने कार थांबवली आणि सहकाऱ्यांच्या मदतीने केला दरोडा

मुंबई :- महाराष्ट्राच्या विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आता गुन्हेगारीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध सराफा व्यापाऱ्याला लुटण्यासाठी चक्क त्याच्याच चालकाने दरोडेखोरांशी हातमिळवणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल साडेचार किलो सोन्यासह लाखो रुपयांची रोकड लुटण्यात आली आहे. Mumbai Samruddhi Highway Latest Crime News

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सराफा व्यापारी शेषमलजी जैन हे खामगाव येथे व्यापारानिमित्त आले होते. काल (22 ऑगस्ट) सायंकाळी ते आपल्या कारने मुंबईकडे परत जात होते. मेहकर टोल नाका पार केल्यानंतर त्यांच्या चालकाने ‘मला फ्रेश व्हायचंय’ असे कारण देत रस्त्याच्या कडेला कार थांबवली. याच संधीचा फायदा घेत, मागून आलेल्या दुसऱ्या एका चारचाकी वाहनातून चार दरोडेखोर खाली उतरले. त्यांनी जैन यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील 4.5 ते 4.75 किलो सोने आणि रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे, दरोडेखोर निघून जाताना त्यांचा चालकही त्यांच्या गाडीत बसून फरार झाला.

या घटनेमुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्यापारी जैन यांनी तात्काळ मेहकर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी व्यापाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी राज्यभर नाकाबंदी केली. दरोडेखोरांची कार अकोला जिल्ह्यातील पातूरजवळ आढळली, मात्र तोपर्यंत दरोडेखोर पळून गेले होते.

या प्रकरणाने समृद्धी महामार्गावर होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण अधोरेखित केले आहे. अपघातांचे प्रमाण कमी झाले असले, तरी येथे गाड्यांवर दगडफेक करणे आणि लुटमारीच्या घटना वाढत आहेत. या घटनेमुळे आता प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेहकर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0