NCP Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी पवारांचा हुंकार: ‘नव्या नेतृत्वाला संधी’!

NCP Sharad Pawar: युवा पिढीला बळ देणार; 50% महिलांना उमेदवारीचा धोरणात्मक निर्णय
पुणे: पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकांनंतर नव्या नेतृत्वाला संधी देण्याचं मोठं विधान करत राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण केलं आहे. पक्षाच्या स्थापना दिवसापासून ते आतापर्यंतच्या संघर्षावर अनेक प्रमुख नेत्यांनी प्रकाश टाकत शरद पवारांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. त्यानंतर आपल्या भाषणात पवारसाहेबांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. NCP Sharad Pawar
शरद पवार म्हणाले, “आजपासून 26 वर्षांपूर्वी आपण एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. जनतेच्या प्रचंड पाठिंब्यामुळे पक्षाला उभारी मिळाली आणि अल्पावधीतच महाराष्ट्राचा कारभार करण्याची संधी जनतेने दिली. सामान्य माणसाला संधी दिल्यास तोही कर्तृत्व दाखवून राज्य चालवू शकतो, हे सिद्ध झालं. जयंत पाटील यांनी अर्थमंत्री म्हणून 10 वर्षांचा अनुभव गाठला आहे.”
येत्या दोन-तीन महिन्यांवर आलेल्या जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये 50 टक्के जागा महिलांना देण्याचा धोरणात्मक निर्णय पक्षाने घेतल्याचंही पवारांनी जाहीर केलं. “कर्तृत्वाचा वाटा केवळ पुरुषांचाच असतो यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात. हा निर्णय यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,” असे ते म्हणाले.
पक्षात फूट पडेल असे कधी वाटले नव्हते, मात्र ती पडली, असे सांगत पवारांनी पक्षातील फुटीवरही सूचक भाष्य केले. “यावर मला अधिक बोलायचे नाही. जे राहिले ते विचाराने राहिले. 1980 साली माझ्या हातात सत्ता नसतानाही निवडणुकीनंतर 50 आमदार निवडून आले होते. नंतर पक्ष सोडून गेले आणि केवळ सहाच राहिले. त्यातले एक कमल किशोर कदम इथे उपस्थित आहेत. त्या सहा जणांवरून पुन्हा राष्ट्रवादीची संख्या 72 पर्यंत पोहोचली आणि पुन्हा राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे चिंता करू नका, आपण एकसंध राहू. जनतेशी बांधिलकी ठेवणे महत्त्वाचे आहे,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.
देशहिताला नेहमीच प्राधान्य देण्याचा राष्ट्रवादीचा विचार असल्याचेही पवारांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “देशाचा विचार करताना राष्ट्रवादी कधीही राजकारण आणत नाही. पहलगाममधील हत्येनंतर राष्ट्रवादीने देशहिताची भूमिका घेतली होती. शेजारी राष्ट्रांसोबत सुसंवादाची परिस्थिती नाही, असे सांगत त्यांनी सध्याच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवरही भाष्य केले.



