Ghatkopar Accident News : घाटकोपरमध्ये भरधाव कारचा भीषण अपघात; पदपथावर झोपलेले ३ जण गंभीर जखमी

Ghatkopar Accident News : मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याचा संशय; आरोपी ताब्यात
मुंबई :- घाटकोपरमधील एल.बी.एस. मार्गावर आज, शनिवारी सकाळी एका भरधाव वेगात असलेल्या कारने भीषण अपघात घडवला. गाडी दुभाजकाला धडकून थेट काही दुकानांवर आदळली. या अपघातात पदपथावर झोपलेले तीन नागरिक गंभीर जखमी झाले असून, त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमके काय घडले?
आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घाटकोपरमधील एल.बी.एस. मार्गावरील महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयाजवळ ही घटना घडली. भरधाव वेगात येणाऱ्या एका मोटारगाडीने अचानक दुभाजक ओलांडला आणि ती विरुद्ध दिशेने जाऊन थेट दुकानाच्या पायऱ्यांवर आदळली.
यावेळी दुकानाच्या पायऱ्यांवर आणि पदपथावर तीन जण झोपलेले होते. गाडीची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
गाडी दुभाजक ओलांडून दुकानांवर आदळली; राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीमध्ये दोन तरुणी आणि एक तरुण होता. हे तिघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर घाटकोपर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.



