Ajit Pawar Funeral Live : निरोप दादांना! बारामतीचा ‘लोकनेता’ आज मातीत विलीन होणार; ‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये थोड्याच वेळात अंत्यविधी

Ajit Pawar Latest News : अमित शाह, नितीन गडकरींसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती; काटेवाडी ते बारामती असा जनसागर लोटला
बारामती | ज्या मातीने अजितदादांना घडवले, ज्या बारामतीचे त्यांनी नंदनवन केले, त्याच मातीत आज एका महानायकाचा प्रवास थांबणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज, गुरुवार 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.Ajit Pawar Funeral Live Update
अंतिम यात्रेचे नियोजन
अजितदादांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो समर्थकांनी बारामतीत गर्दी केली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अंतिम प्रवास खालीलप्रमाणे असेल,
सकाळी 9 वाजेपर्यंत: पार्थिव काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
सकाळी 9.15 वाजता: काटेवाडी येथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा ग. दि. मा. सभागृहामार्गे विद्या प्रतिष्ठानकडे मार्गस्थ होत आहे.
सकाळी 11 वाजता: विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडतील.
राष्ट्रीय नेत्यांची मांदियाळी आणि कडेकोट सुरक्षा
अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी दिल्लीहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बारामतीत दाखल होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासूनच बारामतीत उपस्थित असून त्यांनी पवार कुटुंबाचे सांत्वन केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बारामती विमानतळ आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणी NDRF आणि पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.
राज्यात 3 दिवसांचा दुखवटा
अजितदादांच्या निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून आज 29 जानेवारी रोजी देखील अनेक ठिकाणी व्यवहार बंद ठेवून लाडक्या दादांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. बारामतीमधील प्रत्येक घर आज शोकाकुल असून “अजितदादा अमर रहे” अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला आहे.



