Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा; लालबागचा राजा मंडप शुल्कात सवलतीचे आश्वासन

•Ganeshotsav Guidelines 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सार्वजनिक गणेश मंडळांशी बैठक; रस्त्यांच्या खड्ड्यांचे शुल्कही होणार माफ
मुंबई :- अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा देत त्यासाठीचा आराखडा लवकरच जाहीर केला जाईल, अशी घोषणा केली. तसेच, लालबागचा राजा गणेश मंडळासह अनेक मंडळांनी केलेल्या विविध मागण्यांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला.
बैठकीत लालबागचा राजा मंडळाकडून अग्निशमन दलाच्या बंबासाठी आकारण्यात येणारे दिवसाला सव्वा लाख रुपये शुल्क कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावर मुख्यमंत्र्यांनी सवलतीचे आश्वासन दिले. याशिवाय मंडप उभारणीसाठी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या शुल्कात मोठी कपात करून 15 हजारांवरून 2 हजार रुपये करण्यात आले असून, हे शुल्कही पूर्णपणे माफ करण्याची तयारी दर्शवली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पोलिस विभागाला विसर्जन मिरवणुका आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी समन्वय राखण्याच्या सूचना केल्या. तसेच, ‘ऑपरेशन सिंदुर’ आणि ‘स्वदेशी’ या विषयांवर गणेश मंडळांनी जनजागृती करावी, असेही आवाहन केले.
सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे मुंबई अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनीही बैठकीत मांडलेल्या मागण्यांबाबत माहिती दिली. प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींवरील निर्बंधांबाबत कायमस्वरूपी दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली असून, पर्यावरणीय अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय होणार असल्याचे सांगितले.


