मुंबई

Ganesh Ustav Metro Seva : मुंबईकरांसाठी खुशखबर! गणेशोत्सवात मेट्रो सेवा मध्यरात्री 12 पर्यंत सुरू राहणार

Ganesh Ustav Metro Seva : 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरदरम्यान प्रवाशांची गैरसोय टळणार, दररोज 12 अतिरिक्त फेऱ्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईतील मेट्रो प्रवाशांना एक मोठी भेट मिळाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मेट्रो 2 ए’ (दहिसर-अंधेरी पश्चिम) आणि ‘मेट्रो 7’ (दहिसर-गुंदवली) या दोन्ही मार्गांवरील सेवांचा कालावधी एक तासाने वाढवला आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो सेवा रात्री 11 ऐवजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हा निर्णय 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या 11 दिवसांसाठी लागू असेल.
गणेशोत्सवादरम्यान गणपतीचे दर्शन, देखावे पाहणे आणि विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. रात्री उशिरापर्यंत प्रवास करणाऱ्या या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एमएमआरडीएने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईकरांना रात्री उशिरापर्यंत मेट्रोचा सुरक्षित आणि सोयीचा पर्याय उपलब्ध होईल.

फेऱ्या आणि वेळेत वाढ

सेवा कालावधी वाढविल्यामुळे मेट्रो गाड्यांच्या दैनंदिन फेऱ्यांमध्येही वाढ होणार आहे. सोमवार ते शुक्रवारदरम्यान सध्या या मार्गांवर दररोज 305 फेऱ्या होतात, मात्र गणेशोत्सवाच्या 11 दिवसांमध्ये दररोज 12 अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या 317 पर्यंत पोहोचेल.
या बदललेल्या वेळापत्रकानुसार:

  • सोमवार ते शुक्रवारदरम्यान आता दर 5 मिनिटे 59 सेकंदांनी एक मेट्रो धावणार आहे.
  • गर्दी नसलेल्या वेळेत ही वेळ 9 मिनिटे 30 सेकंद इतकी असेल.
  • एकूण फेऱ्यांची संख्या प्रतिदिन 256 (पूर्वीच्या तुलनेत 12 ने अधिक) होईल.
  • रविवारी एकूण 217 फेऱ्यांच्या तुलनेत 229 फेऱ्या चालवल्या जातील.

एमएमआरडीएच्या या निर्णयामुळे गणेशोत्सव काळात मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सोयीचा होणार आहे.

vivek

Recent Posts