Gandhi Vs Ambedkar : गांधी विरुद्ध आंबेडकर, आरोप प्रत्यारोपचे मालिका
•वंचित म्हणजेच प्रकाश आंबेडकर ही भाजपाची बी टीम… तुषार गांधी यांचा आंबेडकरांवर आरोप
मुंबई :- सत्ताधारी भाजपची युती गद्दारांची आहे. या गद्दारांच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय होणे महत्त्वाचे आहे. यासाठी कुणीही एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये, असे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनावर वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेत त्यांची टीका फेटाळून लावली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबतची जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे त्यांनी एकला चलो रेची भूमिका घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यांनी मविआविरोधात उमेदवारही दिले. आता त्यांच्या निर्णयावर तुषार गांधी यांनी टीकेची झोड उठवली आहे. तुषार गांधी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, भाजपची युती ही गद्दारांची युती आहे. तिचा पराभव झाला पाहिजे. यासाठी मतदारांनी एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये. महाविकास आघाडीला मतदान करावे,असे ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांबाबत मैत्रीभाव आहे, पण यावेळी त्यांनी स्पष्ट भूमिका घेणं गरजेचे होते. वंचितनं जबाबदारी समजायला हवी होती. स्वत:चा फायदा बाजूला ठेवून राष्ट्राचं हित पाहिलं नाही म्हणून ते टीका पात्र आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेचा फायदा भाजपालाच होणार आहे. वंचित आणि एमआयएमच्या मतांमुळे काँग्रेस आणि पुरोगामी पक्षांना नुकसान होणार हे स्पष्ट आहे असं तुषार गांधींनी म्हटलं होते.
आंबेडकरांचे तुषार गांधी यांना पत्र
प्रिय तुषार गांधी,
तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच; पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे.
तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नाही. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहीत नाही का?
महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का? जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर कृपया निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका. काळच सत्य परिस्थिती समोर आणेल. खरं तर, आताच सगळे संकेत दिसत आहेत. पण, तुम्ही डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन ज्याला काहीही आधार नाही असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहात.