Gaja Marne : गजा मारणेला निवडणुकीसाठी दोन दिवस पुणे ‘प्रवेशा’ची परवानगी! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; पत्नी जयश्री मारणे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून रिंगणात

Ajit Pawar Member gaja marne : मोक्का अंतर्गत पुणे बंदी असतानाही मतदानासाठी सवलत; 15 जानेवारीला मतदान आणि 16 ला निकाल, पुण्यात ‘गजा’ची एन्ट्री ठरणार चर्चेचा विषय
पुणे | पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील चर्चित नाव असलेला गजानन मारणे आता महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहे. त्याची पत्नी जयश्री मारणे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोथरूड (बावधन) भागातून निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर, पत्नीला मतदानाच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी मदत करण्यासाठी मारणेने पुण्यात येण्याची परवानगी मागितली होती, जी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे.
नेमकी पार्श्वभूमी काय?
गजानन मारणेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय संगणक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्याला पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई (जिल्हा बंदी) केली होती. सध्या तो त्याच्या मुळशी येथील घरी वास्तव्यास आहे.
पोलीस विरोध आणि न्यायालयाचा निकाल
गजा मारणेने सुरुवातीला पुणे न्यायालयात अर्ज करून पत्नीच्या प्रचारासाठी शहरात येण्याची मुभा मागितली होती. मात्र, “मारणे पुण्यात आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल,” असा युक्तिवाद करत पुणे पोलिसांनी याला तीव्र विरोध केला होता. परिणामी, खालच्या न्यायालयाने केवळ मतदानासाठी आणि कोर्टाच्या तारखेसाठी सवलत देत त्याचा अर्ज फेटाळला होता.
या निर्णयाला मारणेचे वकील अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, मारणेला 15 जानेवारी (मतदान) आणि 16 जानेवारी (मतमोजणी/निकाल) या दोन दिवसांसाठी पुणे शहरात राहण्याची परवानगी दिली आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा
अजित पवार गटाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाला उमेदवारी दिल्यामुळे आधीच पुण्यात टीकेची झोड उठली होती. त्यातच आता खुद्द गजा मारणे मतदानाच्या दिवशी पुण्यात उपस्थित राहणार असल्याने पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आता मारणेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.



