
Alibhaug Breaking News : झाडातील मोहळ अचानक उठले; 5 जण जखमी, एका कामगाराची प्रकृती चिंताजनक; कर्नाळा दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये धाकधूक
अलिबाग (रायगड) :- रायगड जिल्ह्यात मधमाशांच्या हल्ल्याचे सत्र थांबताना दिसत नाहीये. कर्नाळा अभयारण्यात काही महिन्यांपूर्वी मधमाशांच्या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अलिबाग तालुक्यातील धोकवडे परिसरात पुन्हा एकदा अशीच एक गंभीर घटना घडली आहे. एका खासगी बंगल्याच्या बांधकामावर काम करणाऱ्या पाच कामगारांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला, यात एका कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे.
धोकवडे येथे काम सुरू असताना जवळच्या झाडातून मधमाशांचे मोठे मोहळ अचानक उठले आणि त्यांनी कामगारांवर जोरदार हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे कामगार सैरावैरा पळू लागले. यात विशाल राजू मेहता, निमेश कुमार यांच्यासह एकूण पाच जण जखमी झाले.
हल्ल्यातून बचाव करण्याचा प्रयत्न करत असतानाही, कामगार विशाल राजू मेहता हा मधमाशांच्या तावडीत सापडला. त्याला सर्वाधिक डंख मारण्यात आले, ज्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला तातडीने अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर चार कामगारांवर किरकोळ उपचार करून त्यांना सोडण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील कोळवट आणि नीवे यांसारख्या गावांमध्येही मधमाशांच्या दंशाच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि मधमाशांच्या थव्यापासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


