FDA Raid : धारावीत FDA ची मोठी कारवाई! विनापरवाना औषध साठवणूक उघड; 1 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

FDA Raid In Dharavi : मे. अपना मेडिकल स्टोअर्सच्या गोदामावर धाड | सलाईनसह औषधांचा अवैध साठा जप्त | औषध नमुने प्रयोगशाळेत रवाना
मुंबई :- मुंबईतील धारावी परिसरातील कुंभारवाडा भागात औषधांचा अवैध साठा केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) 18 फेब्रुवारी 2026 रोजी धडक कारवाई केली. परवाना नसलेल्या जागेत औषधांची साठवणूक करून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विभागाने 1 लाख 3 हजार 550 रुपये किमतीचा औषध साठा आणि सलाईन जप्त केले आहेत.
नेमका प्रकार काय?
शीव (Sion) येथे ‘मे. अपना मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स’ या नावाने औषधांचे दुकान चालविणाऱ्या एका व्यक्तीने धारावीतील एका खोलीत बेकायदा औषधांची साठवणूक केल्याची माहिती FDA च्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली होती. या गोदामासाठी संबंधित मालकाकडे कोणताही कायदेशीर परवाना नव्हता, तसेच त्यांनी परवान्यासाठी कोणताही अर्जही केला नव्हता. ही माहिती मिळताच औषध निरीक्षक हेमंत अडे आणि अजय माहुले यांच्या पथकाने कुंभारवाडा येथील जागेवर छापा टाकला.
कायद्याचा भंग आणि जप्ती
तपासणी दरम्यान, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 आणि नियम 1945 च्या तरतुदींचे सरळ सरळ उल्लंघन झाल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. विनापरवाना जागेत अस्वच्छ किंवा अनियंत्रित परिस्थितीत औषधे साठवणे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने घटनास्थळावरून संपूर्ण साठा जप्त केला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर सलाईनच्या बाटल्या आणि इतर जीवरक्षक औषधांचा समावेश आहे.
प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा
जप्त करण्यात आलेल्या औषधांपैकी काही महत्त्वाचे नमुने औषध निरीक्षक हेमंत अडे यांनी चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. या औषधांची गुणवत्ता कशी आहे आणि ती मानवी वापरासाठी सुरक्षित आहेत का, याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित मेडिकल स्टोअर्सच्या मालकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासकीय पथकाची कामगिरी
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्रीधर डुबे पाटील, सह आयुक्त डॉ. राहुल खाडे आणि सह आयुक्त विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच सहायक आयुक्त वि. आर. रवि, प्रवीण हरक आणि डी. एम. दरंदळे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.



