Father Francis Dibrito Death : मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन
•Father Francis Dibrito Passed Away ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास
वसई :- फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन झालंय. गेल्या काही वर्षांपासून ते आजाराशी लढत होते. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली.फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास जेलाडी येथील त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. होली स्पिरिट चर्च (नंदाखाल) येथे त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. त्यांचे अत्यंसंस्कार सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात येईल.
वसईतील राहत्या घरी असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. धाराशीव येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भूषवलं आहे. त्यांच्या जाण्यामुळे मराठी साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी 1972 मध्ये कॅथलिक धर्मगुरुपदाची शपथ घेतली होती. ते धर्मगुरू असले तरी त्यांची ओळख पर्यावरणप्रेमी, जुलूमाविरोधात आवाज उठवणारे अशी होती. पालघर जिल्ह्यात त्यानी पर्यावरण बचावासाठी वारंवार आवाज उठवला होता. त्यांनी सुवार्ता नावाचे एक मासिक सुरू केले होते. या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे काम केले.हरित वसई संरक्षण समितीची त्यांनी स्थापना केली होती. या माध्यमातून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण रक्षण, जतन आणि संवर्धनाचे काम केले. राजकारणातील गुन्हेगारी विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. त्यांनी त्यांच्या एका पुस्तकाच्या लिखाणासाठी इस्राइलमध्ये काही काळ घालवला आहे.